फोटो - सोशल मीडिया
नागपूर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. सर्व नेत्यांच्या सभा, बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूका पार पडल्या. यावेळी भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही. महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने विधानसभेसाठी मोठा प्लॅन तयार केला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये नेमक्या काय चुका झाल्या याबाबत आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत देशाचे मुद्दे बाजूला राहिले आणि निवडणूक लोकल मुद्यांवर लढली गेली. संसदेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसारखी झाली. ग्रामपंचायतीचे मुद्दे आणि नगरपालिकेचे मुद्दे त्या निवडणुकीत आले होते. महाविकास आघाडीने भाजपा संविधान बदलणार आहे, अशा प्रकारचा प्रचार केला. मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली. तसेच राहुल गांधींनी सांगितलं की त्यांचे खासदार निवडून आले तर खटाखट खटाखट पैसे देऊ. याचा अर्थ त्यांनी संभ्रम तयार केला. जनतेला खोटे बोलून मतदान घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला. आताही राहुल गांधी यांच्या एका विधानावरून असं दिसतं आहे की त्यांची मानसिकता आरक्षण संपवण्याची आहे” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे.
पुढे बावनकुळे म्हणाले की, “आम्ही जनतेची कामे करतो, तेव्हा आम्हाला अपेक्षा असते की आम्हाला मते मिळतील. मात्र, मते मिळाली नाहीत, त्यानंतर आम्हीही त्याच्या खोलात गेलो. लोकसभा निवडणुकीत आम्ही हरलो आहोत, त्यामधून काही शिकलोही आहोत. मात्र, आमची ती चूक दुरुस्त करून आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. देशाची निवडणूक स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसारखी होईल याचा आम्हाला अंदाज आला नाही. खरं तर आम्ही निवडणुकीचा अंदाजच घेतला नाही. निवडणूक अशाच मुद्यांवर फिरत राहिली. त्यामुळे आम्हाला आता अंदाज आला आहे की, निवडणुकीत काय झालं? हे मान्य आहे की काही गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत. विरोधकांकडून लोकल मुद्दे मांडण्यात आले. मात्र, आम्हीही याचाही अंदाज घेऊ शकलो नाही. 12 जागा आमच्या थोडक्यात गेल्या. परिस्थिती एवढी घासून होईल याचा अंदाज आला नाही” अशी कबुली चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या एकत्रित लढण्यावर आणि अजित पवार यांच्याबाबत देखील मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की,”महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. आम्ही ज्या विचारांवर पक्ष चालवतो त्या पक्षाचे वेगळे विचार आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे विचार वेगळे आहेत. शेवटी आम्ही एकत्र कशासाठी आहोत? देशातील आणि महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष जर महायुतीच राहिलं तर महाराष्ट्राला विकासाठी फायदा होईल. “महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारने आणलेल्या योजना महत्वाच्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं तर हे सर्व योजना बंद करतील. मी द्याव्याने सांगतो. कारण कर्नाटकमध्ये त्यांनी सर्व योजना बंद केल्या आहेत,” असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.