'महायुतीच्या पक्षांसोबत कुठंही आघाडी नाही'; मनसेला सोबत घेणार का? तर सपकाळ म्हणाले... (संग्रहित फोटो)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नगरपरिषद, नगर पंचायत यांसारख्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी वा युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असले तरी काँग्रेस पक्ष विचारधारेवर अढळ असून, ही सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे. इंडिया आघाडीतील पक्ष व इतर समविचारी पक्षांशी आघाडीबाबत चर्चा होत आहे. पण महायुतीतील न कोणत्याही पक्षाशी युती केली जाणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्वाची बैठक टिळक भवन येथे झाली. या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, आघाडीबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, इंडिया आघाडी म्हणून चर्चा करण्याच्या सूचना स्थानिक नेतृत्वाला दिल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी घटक पक्ष तसेच स्थानिक आघाडीसंदर्भात चर्चा केली आहे. वामनराव चटप, राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा पक्ष यांच्याशी चर्चा सुरु असून, काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी झाली आहे.
मनसेसंदर्भात आघाडीचा कोणताही प्रस्ताव नाही
मनसेसंदर्भात आघाडीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. कालच आरक्षण जाहीर झाले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच आघाडी करायची की स्वबळावर लढायचे यावर निर्णय घेतला जाईल, असेही सपकाळ म्हणाले.
अर्ज ऑफलाईन भरण्याचीही मुभा द्या
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. हा उमेदवारी अर्ज तब्बल २५ पानांचा असून तो ऑनलाईन पद्धतीने भरून त्याची प्रिंट काढून ऑफलाईन सादर करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज भरताना अनेक भागात इंटरनेट, सर्व्हर डाऊनच्या अडचणी येतात. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीला ज्यापद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया असते, तशीच सोपी पद्धत असावी. तसेच हे उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्याचीही मुभा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
हेदेखील वाचा : ‘काँग्रेसमध्ये गटबाजी नाही, जिल्ह्यात केवळ मुलाखतीच घेतल्या’; सपकाळांचा यू-टर्न






