काँग्रेसमध्ये गटबाजी नाही; जिल्ह्यात केवळ मुलाखतीच घेतल्या; प्रदेशाध्यक्षांचा यू-टर्न
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच एक दिवसांपूर्वीच जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत निरीक्षक पाठवून बैठकच अवैध असल्याची तंबी देणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यू-टर्न घेतला आहे. परस्पर होत असलेली ही प्रक्रिया आधी चुकीची असल्याचे सांगत, ‘केवळ मुलाखतीच घेतल्या. निवडणूक कामांबाबतची रणनीती एकत्रित बसून आखल्या जाईल. पक्षात कुठलीही गटबाजी नाही’ असा सपकाळ यांनी घुमजाव केला आहे.
जिल्हा काँग्रेसच्या बैठकीवर प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी तीव्र नाराजी नोंदवत निरीक्षकांना पाठवून उपस्थित नेत्यांना कानपिचक्या शुक्रवारी दिल्या होत्या. बैठकीत अचानक धडकलेल्या निरीक्षक माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी प्रदेशाध्यक्षांचा संदेश कठोर भाषेत सुनावला. त्यानंतरही मुलाखती घेतल्या गेल्या. त्यावरून जिल्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाही जुमानत नाही, असा संदेश गेला. मात्र, शनिवारी खुद्द सपकाळ यांनीच यापासून फारकत घेत पक्षात कुठलीही गटबाजी नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
हेदेखील वाचा : राजकीय घडामोडींना वेग, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत रंगणार; कोणत्या पक्षाचे पारडे जड?
दरम्यान, सपकाळ यांनी सांगितले की, यावेळी नगरपालिका निवडणुकीत तरुण आणि नवीन कार्यकत्यांना संधी देण्यात येईल. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा प्रभाव कमी झालेला नाही. जिल्हाध्यक्ष बैस यांनी बैठकीतील सर्व माहिती पदाधिकाऱ्यांना सांगितली. परंतु, काही उपस्थित राहू शकले नाहीत. बैठक ही बेकायदेशीर नव्हती. अनेक प्रदेश पदाधिकारी, निरीक्षक व आघाडयांचे प्रमुखही हजर होते. या मुलाखती अंतिम नाही. फक्त इच्छुकांची माहिती नोंदविण्यात आली. यासंदर्भात निवडणूक निरीक्षकांनी भाष्य करण्यास नकार दिला.
भाजप-महायुतीचे सरकार गेंड्याचे कातडीचे
भाजप-महायुतीचे सरकार गेंड्याचे कातडीचे असून, या सरकारचा कारभार पाहता त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. दररोज एक मोठे प्रकरण उघड होत असून, कारवाई मात्र शून्य आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुणेसह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यापूर्वीच केली आहे.






