कोल्हापूरच्या 'या' निवडणुकीत येणार रंगत; एक-दोन नव्हेतर तीन आघाड्या एकत्र
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडी मिळून जयसिंगपूर शहर विकास पॅनेलच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत आहोत, अशी घोषणा माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील तसेच गुरुदत्त कारखाना चेअरमन माधवराव घाटगे यांनी केली.
जयसिंगपूर येथील माधवराव घाटगे यांच्या निवासस्थानी गुरुवारी पत्रकार बैठक झाली. या बैठकीला शिरोळ विकास आघाडीचे खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील, भाजपचे नेते माधवराव घाटगे, राजवर्धन नाईक निंबाळकर आदींनी जयसिंगपूर विकास आघाडीच्या बॅनर खाली एकत्र आले आहेत. त्यामुळे जयसिंगपुरात प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी राज्यातील जिल्ह्यातील राजकारणाशी या आघाडीचा संबंध नाही. तसेच जिल्ह्याचे नेते यांचाही संबंध नाही, असे स्पष्ट करत फक्त जयसिंगपूरतील मालक सिस्टिम मोडीत काढणार असून, इथल्या शहराचा सर्वांगीण विकास व भ्रष्टाचारमुक्त शहर करण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे सांगितले.
हेदेखील वाचा : Sharad Pawar : सत्याच्या मोर्च्यामध्ये एकत्र येता तर निवडणुकीत का नाही? मविआच्या जेष्ठ नेत्यांनी धरले कॉंग्रेसचे कान
जयसिंगपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून माजी खासदार राजू शेट्टी, उद्यानपंडित गणपतराव पाटील व माधवराव घाटगे यांनी एकत्रित येऊन सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीसमोर नगराध्यक्षपदासह सक्षम पर्याय देण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना माधवराव घाटगे यांनी शहरातील पिग्मी एजंट ते नामांकित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सामान्य कुटुंबातून आलेले सुदर्शन कदम यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ ते १३ मध्ये आघाडीच्या माध्यमातून सर्व उमेदवार उभे केले असून, त्यांना निवडून द्या, असे सांगितले.
…म्हणून आम्ही एकत्र येत निवडणूक लढवतोय
यावेळी गणपतराव पाटील यांनी शहराचा विकास होईल, असे वाटत होते. परंतु, न झाल्याने आता आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या हाती सत्ता आल्यास आम्ही शहराच्या सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, गुरूदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्यासह आघाडीचे सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.






