शिवसेनेमध्ये मर्सिडीज गाड्या देण्याच्या नीलम गोऱ्हेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. यामध्ये एका कार्यक्रमामध्ये शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच ठाकरे गटातील कारभारावर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटामध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळालचं असे वक्तव्य केले आहे. यावरुन आता राजकारण रंगले असून ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या गंभीर आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, दाखवा ना मला मर्सिडिज कुठे आहेत? हे असले गयेगुजरे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. महिला म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे. राजकारणात त्यांनी चांगभलं केलं आहे. ते तसंच रहावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना उत्तर दिलं आहे. तसंच स्वतः मर्सिडिजमधून फिरतात मग लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाहीत? हे त्या का बघत नाहीत? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना विचारला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. खासदार राऊत म्हणाले की, की जर नीलम गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंनी चारवेळा आमदार केलं आहे तर मग त्यांनी उद्धव ठाकरेंना आठ मर्सिडिज दिल्या आहेत का? त्या दिल्या असतील तर त्याच्या पावत्या वगैरे घेऊन याव्यात त्यांनी. असं म्हणत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना टोला लगावला आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी आहे, असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिलं. मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाही, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या होत्या नीलम गोऱ्हे?
साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमामध्ये नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीच मिळणार नाहीत हे माहीत नव्हतं,” असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.