उल्हासनगर मधील ओमी कलानी गटाचा एकनाथ शिंदेंना जाहीर पाठिंबा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असल्याच्या चर्चांमुळे अंतर्गत राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ठाकरे बंधुंच्या युतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा राजकीय फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई, कल्याण- डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिकेत ठाकरे बंधूंचा प्रभाव पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे बंधूंच्या हालचालींना रोखण्यासाठी आपले डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. उल्हासनगर महापालिकेत प्रभावी मानल्या जाणाऱ्या टीम ओमी कलानी गटाने शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे.
Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात ‘दोस्ती का गठबंधन’ जाहीर करण्यात आले. याच अनुषंगाने, शुक्रवारी शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली. यावेळी ओमी कलानी यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आणि एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. टीम ओमी कलानी गटाने तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी ओमी “आगामी महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेसमवेत एकत्रित लढण्याची इच्छा बाळगतो.” असे कलानी यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमधील महापालिका निवडणुकीतील शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे मानले जात आहे.
उल्हासनगर महापालिकेत कलानी कुटुंबाचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र आहे. सत्तेत असो वा नसो, जवळपास प्रत्येक प्रभागात कलानी कुटुंबाचे समर्थक आढळतात. त्यामुळे राज्यात सत्ता असो वा विरोधात असो, उल्हासनगरमधील राजकारणात कलानी कुटुंबाची मदत घेणे राजकीय पक्षांना भाग पडते. सध्या उल्हासनगरचे आमदार भाजपचे कुमार आयलानी आहेत. त्यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीत पप्पू कलानी हे सक्रीय झाले होते. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उघड पाठिंबा दिला होता.