वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली (संग्रहित फोटो)
Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण केले. ऐन गणेशोत्सवामध्ये त्यांनी आझाद मैदानावर पाच दिवसीय उपोषण केले. त्यांच्या यामधील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यामधील हैदराबाद गॅझिट लागू करण्यात आले आहे. याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्यानंतर आता आणखी एक नेता विरोधामध्ये उतरला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने कायद्याला धरुन हा निर्णय घेतलेला नाही असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रकाश आंबेडकर आरक्षणावर भूमिका मांडताना म्हणाले की, सरकारचा निर्णय झाला त्यावेळी मी म्हणालो होतो की सरकारने हा निर्णय कायद्याला धरून घेतलेला नाही. ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे. यावेळी त्यांनी (औरंगाबाद) संभाजीनगर खंड पीठाच्या जजमेंटचा दाखला दिला. सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही असं त्यात नमूद करण्यात आलं होतं, आणि त्यावर सुप्रीम कोर्टातही शिक्का मोर्तब झालं आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले
पुढे ते म्हणाले की, “निझामी मराठा जो सत्तेत बसलेला आहे, त्याला गरीब मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावायचे आहे. निझामी मराठा हे सर्व सत्तेत आहेत, ते ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावतात. सरकारने जे सर्व मराठा ओबीसी आहेत, ही भूमिका घेतली आहे, त्याला ओबीसी विरोध करत आहेत. भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत, आणि आरक्षण असूच नये असे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रकाश आंबेडकर यांनी भाजप हा ओबीसींवर अन्याय करत असल्याचे सांगत जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजप पक्षाकडून सांगितले जाते की आमचा डीएनए ओबीसी असल्याचे म्हटले जाते. पण ओबीसींनी हे समजून घेतलं पाहिजे की सर्वात मोठा शत्रू हेच आहे. मंडल कमिशन वाचवणे आता ओबीसींच्या हातात आहे. त्यांनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केले पाहिजे. दोन चार ओबीसी जिल्हा परिषदला निवडून येण्यापेक्षा, सर्व बॉडी ओबीसी कशी निवडून येईल असे प्रयत्न केले पाहिजे. ओबीसींना राजकीय धोका आहे हे ओळखून घेतले पाहिजे,” असा सावधगिरीचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
मराठा समाजाचे ताट वेगळे पाहिजे
मनोज जरांगे पाटील यांच्या टीममधील वकील(योगेश केदार) आहेत, त्यांनी सल्ले दिले, ते मान्य केले नाहीत. भाजप जे ओबीसी डीएनए म्हणत आहे ते संपलेले आहे, आणि ओबीसींचे खरे विरोधक आता भाजपा आहे अशी टीका आंबेडकरांनी केली. मराठा समाजाला न्याय देऊ शकतो पण त्यांचे ताट वेगळे पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.