दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार का? तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले... (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटून शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट पडले. पण, आता हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा व राज्यात महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे’. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेलाच नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या १० जूनला बालेवाडी स्टेडियम येथे पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकांना महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष सामोरे जाऊ. प्रत्येक महापालिकेतील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. गेली आठ वर्षे निवडणुका झाल्या नाहीत. तरुण कार्यकर्ता या निवडणुकीसाठी आस लावून बसला आहे, त्यामुळे त्यांचाही विचार तिन्ही पक्षांना करावा लागणार आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेलाच नाही. या निर्णयापासून दूर जाण्याचा कुठलाच प्रश्न नाही. पण आमच्यासोबत व मोदींच्या विचारांसोबत ते येऊ शकतात. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेलाच नाही, असे स्पष्टीकरणही तटकरे यांनी दिले.