साताऱ्यात ओबीसी प्रवर्गाचा प्रबळ चेहरा कोण?; सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची हालचाल पुन्हा गतिमान झाली आहे. ग्रामविकास मंत्रालयाने शुक्रवारी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांची आरक्षण जाहीर केली. यामध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे तर पंचायत समिती सभापती पदासाठी प्रवर्गानुसार संख्या निश्चित केली असून सोडत काढली जाणार आहे. ही पदे अडीच वर्षासाठी असणार आहेत.
अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्व राजकीय पक्षांची ओबीसी प्रवर्ग महिलांची चाचपणी सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समिती निवडणूक येत्या काही महिन्यात होत आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अधिसूचना काढून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जाहीर केले आहे. हे अध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.
दुसऱ्यांदा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव
११ पंचायत समिती सभापती पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्या स्पष्ट करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे पूर्वीचे आरक्षण रद्द झाले होते. त्यामुळे नवीन कोणते आरक्षण पडणार याविषयी लक्ष लागून राहिले होते. यावेळी ही ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठीच अध्यक्षपद राखीव झाले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे.
निवडणुका वर्षाच्या अखेरीस होण्याची अपेक्षा
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडूनही या दिशेने तयारी सुरू आहे. एकीकडे निवडणूक आयोग तयारीत व्यस्त असताना, दुसरीकडे सरकारकडून एक मोठी अपडेट आली आहे. सरकारने राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर केले आहे. सरकारने जारी केलेल्या सरकारी आदेशात ठाणे, पालघर, पुणे, सोलापूरसह राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.