येवा कोकण आपलाच आसा असं कोकणी माणसं कायमच म्हणतात. कोकण म्हणजे काय तर कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. या स्वर्गरुपी कोकणात राहणारी माणसं म्हणजे शहाळ्यासारखी गोड आणि मधुर आहेत. निर्सग सौंदर्याची देण असलेल्या कोकणात आकर्षित करणऱ्या गोष्टी म्हणजे तिथल्या धार्मिक रुढी परंपरा आणि त्यासंबंधीतल्या कोकणातील गजाली. कोकणतील धार्मिक परंपरेबाबत सांगायचं झालंच तर बऱ्याच गावात देवाची वाट असते. याबाबत देखील रंजक किस्सा आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही देवाची वाट नक्की असते तरी काय ?
प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते. तिच्या नावाने किंवा गावातील जागृत देवस्थानाचं नाव एखाद्या पायवाटेला किंवा एखाद्या रस्त्याला दिलं जातं त्याला देवाची वाट असं म्हणतात. ही देवाची कोणाच्या शेतातातून जाते तर कोणाच्या अंगणातून जाते. त्याचबरोबर कोणाची विहिर या देवाच्या वाटेवर असते. या वाटा अनेकदा डोंगराळ किंवा दुर्गम भागातून जातात आणि स्थानिक लोकांमध्ये त्या-त्या देवाच्या दर्शनासाठी महत्वाच्या मानल्या जातात. या वाचा काही ठिकाणी राखीव असतात याचं कारण असं सांगितलं जातं की, त्या वाटेने गावकरी त्यांच्या आराध्य देवतेच्या दर्शनाला जातात.
काही वेळा ही देवाची वाट घनदाट जंगलातून आणि डोंगरमाथ्यावरून जाते. एक अरुंद, धोकादायक वाट, जी प्राचीन काळात लोक देवदर्शनासाठी वापरत असत. यामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खडकांमधून पायवाटा, उंचसखल चढ-उतार, जलप्रवाह, धबधबे आणि दाट झाडी यांचा समावेश असतो. ही वाट अतिशय अरुंद असल्याने काही ठिकाणी एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते म्हणूनच ती “देवाची वाट” या नावाने ओळखली जाते, कारण अशा धोकादायक वाटेवरून जाण्यासाठी देवाची कृपा लागते, अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
देवाच्या वाटेबद्दल सांगायचं तर संगमेश्वर तालुक्यात देखील अशा देवाच्या वाटा बऱ्याच गावात दिसतील. तळकोकणात वेतोबा हे जागृत देवस्थान आहे. वेंगुर्ल्यात वेतोबाला मानणारा भाविकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या वेतोबाच्या नावाने वेंगुर्ले तालुक्यातदेखील देवाच्या वाटा आहे. देवाची वाट या संकल्पनेचा धार्मिक दृष्टीकोन बाजूला ठेवून वैचारिक दृष्टीकोनातून पाहिलं तर काही गोष्टी ठळकपणे दिसतात.
निसर्गातील सगळ्या गोष्टींवर माणूस स्वत:चा मालकी हक्क सांगतो. जमिनीच्या तुकड्यावरुन रक्ताच्या नात्यात भांडणं होतात. म्हणूनच देवाची वाट या संकल्पनेतून असा विचार सांगण्यात येतो की, माणूस ज्या जमिनीवर आपला मालकी हक्का सांगतो तो हक्क काही क्षणांपुरता आहे. निसर्गाने दिलेलं वरदान म्हणजे जमिन तिच्यावर शाश्वत हक्क हा देवाचा आहे. हाच विचार प्रत्येकाला कळावा आणि जमिनीसाठी माणसाचा हव्यास वाढू नये याकरिता ही देवाची वाट परंपरा कोकणात आजतागायत पाळली जाते.