फोटो सौजन्य- pinterest
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी १२ वर्षे कठोर तपश्चर्या नाशिक जवळील टाकळी येथे गोदावरी नदीच्या काठावर केली. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि टाकळीला येऊन साधना सुरू केली. त्यांनी जमिनीत गुंफा तयार करून तिथे राहून १२ वर्षे कठोर साधना आणि नामस्मरण केले. ते पहाटेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत गोदावरी नदीत कंबरेपर्यंत पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत असत. या १२ वर्षांच्या कालावधीत त्यांनी १३ कोटी रामनामांचा जप केला. या काळात त्यांनी प्रभू रामचंद्रांची आराधना करून ज्ञान प्राप्त केले आणि स्वतः ‘रामदास’ (रामाचा दास) हे नाव धारण केले.
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी नाशिक जवळ टाकळी या ठिकाणी १२ वर्षे तप केले. या ठिकाणी जमिनीत गुंफा असून तिथे श्री समर्थ तप करीत. पहाटेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत शेजारी असलेल्या नदी पात्रात कंबरे इतक्या पाण्यात उभे राहून जप करायचा. नंतर गावात जाऊन भिक्षा घ्यायची आणि परत आल्यावर भिक्षेतील अल्प भाग सेवन करून परत ध्यान धारणा आणि इतर साधना करायची असा त्यांचा दिनक्रम असायचा. याच तपश्चर्या काळात श्री मारुतीने श्री समर्थांना मोठ्या वानराच्या रूपाने दर्शन दिले होते. श्री समर्थ पाण्यात जप करत उभे असताना एक मोठा वानर समोरच्या झाडावर बसून असे. काही दिवसांनी त्याने जवळ येऊन श्री समर्थांना मिठी मारली तेव्हा त्याच भाव मग्न अवस्थेत श्री समर्थांनी “भीम रुपी महारुद्रा” या अत्यंत प्रासादिक आणि पूर्ण प्रचिती देणाऱ्या स्तोत्राची रचना केली, अशी मान्यता आहे.
श्री समर्थांनी पुढे याच ठिकाणी गोमय अर्थात गाईचे शेण आणि नदीकिनारी असलेली वाळू यांच्या मिश्रणातून श्री मारुतीची मूर्ती बनवली. या मूर्तीची स्थापना श्री समर्थांनी स्व हस्ते केलेली असून आजसुद्धा हा श्री मारुती “गोमयाचा मारुती” म्हणून प्रसिद्ध आहे. श्री समर्थांनी आपल्या पहिल्या शिष्य उद्धवस्वामींसाठी ही मूर्ती बनवली होती. असे बोलले जाते. हे मंदिर समर्थांच्या आध्यात्मिक प्रवासाची आणि त्यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींच्या परंपरेची सुरुवात मानली जाते.
पूर्वी या ठिकाणी जी गुंफा होती तिच्यात वरून खाली उतरावे लागे. त्या करता पायऱ्या केलेल्या होत्या. मध्ये टाकळी देवस्थानचा विकास आणि मंदिराचे नूतनीकरण झाले. तेव्हा आता ही गुंफा पाहायला जाताना एका मोठ्या दालनातून आत जाऊन उजवीकडे वळावे लागते. वळले की आपण थेट या गुंफेत प्रवेश करतो. मंदिराचे नवीन काम अतिशय सुंदर केलेले असून मंदिराच्या आवारात एक छोटी विहीर सुद्धा आहे, जी श्री समर्थ काळातील आहे. मंदिर सुद्धा प्रशस्त असून पायऱ्या चढून वर आलो की आपल्याला समोरच श्री मारुतीरायाचे प्रसन्न असे दर्शन होते. श्री मारुतीचे स्वरूप बाल मारुती स्वरूपात असल्यासारखे आहे. पण मूर्ती पाहताना ती शेण आणि वाळू यांच्या मिश्रणातून बनली आहे हे पटकन समजत नाही, इतकी सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. या मंदिरात मनाला अतिशय शांती लाभते. तसेच आज सुद्धा आपण श्री समर्थांच्या गुंफेत गेलो की निदान १० मिनिटे तरी तिथे स्वस्थ बसून चित्त एकाग्र करून ध्यान करावे. कारण ज्या ठिकाणी एखादे संत, सत्पुरुष स्वतः साधन – चिंतन – ध्यान – ईश्वराची आराधना करतात. ते स्थान कायमचं पवित्र असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: समर्थ रामदास स्वामींनी गायीचे शेण (गोमय) आणि नदीकिनाऱ्याची वाळू यांचे मिश्रण करून मारुतीरायांची मूर्ती तयार केली होती. त्यामुळे या मूर्तीला “गोमयाचा मारुती” असे नाव पडले.
Ans: ते पहाटेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत गोदावरी नदीत कंबरेपर्यंत पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचा जप करत असत. त्यानंतर भिक्षा घेऊन उर्वरित वेळ ध्यानधारणा आणि साधनेत घालवत असत.
Ans: या मंदिरातील मारुतीची मूर्ती शेण आणि वाळूच्या मिश्रणातून बनवलेली आहे. तसेच हे ठिकाण समर्थांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात मानले जाते.






