फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये हरतालिकेच्या उपवासाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महिला महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत मोठ्या भक्तीभावाने आणि थाटामाटात साजरे केले जाते. हा उपवास विवाहित महिला पल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वैवाहिक सुखासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी करतात तर अविवाहित मुली हा उपवास आपल्या पसंतीचा जीवनसाथी मिळावा, यासाठी हा उपवास करतात. मात्र हा उपवास तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तर या दिवशी पूजा कशी करावी आणि कोणते नियम पाळावे, जाणून घ्या.
पंचांगानुसार, यावेळी हरतालिका मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी आहे. पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. असे म्हटले जाते की, देवी पार्वतीने बालपणापासूनच महादेवांना पती म्हणून स्वीकारले होते आणि त्यांच्याशी लग्न करण्याचा संकल्प केला होता परंतु हिमालय राजांनी त्यांचे लग्न भगवान विष्णूंशी निश्चित केले. हे समजल्यावर देवी पार्वती खूप दुःखी झाल्या. आपले दुःख कोणालाही सांगू न शकल्याने त्यांनी आपल्या मैत्रिणीच्या मदतीने घर सोडून जंगलात गेल्या. त्यानंतर महादेवांना प्राप्त करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या सुरु केली. त्यांनी तपश्चर्येदरम्यान अत्यंत थंडी, उष्णता आणि पाऊस या त्रासांना तोंड दिले आणि अन्न आणि पाणी सोडले. त्यांच्या अढळ श्रद्धेने आणि कठोर तपश्चर्येने महादेव प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि त्यांनी त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
हरतालिकांचे व्रत हे सर्व व्रतांपैकी एक महत्त्वाचे व्रत मानले जाते. या दिवशी महिला पाणीही पित नाहीत. हे निर्जल व्रत प्रत्येक जण पाळू शकत नाही. यामुळे ज्या महिला पहिल्यांदाच हा उपवास करतात त्यांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आधीच तयार राहावे. हा उपवास सूर्योदयापूर्वी सुरु होतो. यावेळी महिला आवरुन स्वच्छ कपडे परिधान करुन महादेव, पार्वती आणि गणपती बाप्पाची पूजा करतात. यावेळी पुजेदरम्यान मूर्तींची विधिवत पूजा पाणी, फुले, धूप, दिवे, चंदन, धान्य, फळे आणि मिठाईने केली जाते.
हरतालिकेचा उपवास निर्जल केला जातो. यामध्ये पाण्यासह कोणत्याही द्रवपदार्थाचे सेवन करत नाही.
महादेव आणि पार्वतीची पूजा करताना मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयानंतर पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो.
उपवास सोडण्यापूर्वी नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर महिला पाणी आणि फळे खातात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)