लोकसभा निवडणूक 2024 मध्ये हार झाल्यानंतर भाजप नेत्या स्मृती ईराणी अमेठीमध्ये परत आल्याच नाहीत (फोटो - टीम नवराष्ट्र)
तानाजी म्हणाला, नेताजी आम्ही स्मृतींच्या स्मृती जागविल्या पाहिजेत. अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर स्मृती इराणी तिकडे औषधालाही दिसल्या नाहीत. त्यांचे अमेठीचे घर ओस पडले. लोक ओसाड घराच्या पाटलीण कुठे आहेत, अशी विचारणा करीत आहेत. त्यांनी तर चांगलं घर बनविले आणि त्या मतदारही झाल्यात.
अमेठीत माशी शिंकली अन् स्मृती भुर्र उडाल्या न परतण्यासाठीच. ‘मै तुलसी तेरे आंगण की’ असे त्या अमेठीच्या मतदारांना म्हणत आधी निवडून आल्यात आता मात्र बेपत्ता झाल्यात. एकता कपूर यांनी ‘सास भी कभी बहू थी’ मालिकेत स्मृती इराणींना महत्त्वाची भूमिका छोट्या पडद्यावर सादर केली होती. स्मृतींनी आदर्श पात्र तुलसी बहूची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे साकारली. यातून त्या घराघरांत पोहोचल्या. अमेठीत भाजपाने त्यांना राहुल गांधींच्या विरोधात उभे करून निवडून आणले. त्यांना केंद्रीय मंत्री बनविले. नेताजी म्हणाले, तानाजी स्मृती इराणी माझ्या चांगल्यात लक्षात आहेत व राहतील. त्यांच्या शैक्षणिक योग्यतेवर काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यांना मानव संसाधन विकासमंत्री बनविले होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नामवंत शिक्षण संस्था त्यांच्या विभागाच्या अधिनस्थ होत्या. स्मृती ताम-झाम करीत स्वतःला उच्च विद्याविभूषित दर्शवित होत्या. त्यांनी अमेरिकेच्या वेल विद्यापीठातून एक आठवड्याचा सर्टिफिकेट ऑफ पार्टीसिपेशन कोर्स केला आणि त्यालाच त्यांनी डिग्री सांगितले. तानाजी म्हणाला, नेताजी हे बघा मंत्री होण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. चौथी नापास राजकारणात पास होतो. मग मंत्री बनू शकतो. मुद्दा असा आहे की, स्मृती इराणी पराभूत झाल्यावर घरी परतल्या का नाहीत ?
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जेव्हा त्या प्रथम निवडून आल्यात तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, अमेठी माझे घर आहे. लोकांनी खासदार नाही तर दीदीला निवडले आहे. आता घरी एक झाडझूडवाला येतो अन् एक पंडित नवग्रह मंदिराची पूजा करून जातो. मला वाटते स्मृतींच्या स्मृतीतच हे घर नसावे. चार भिंती बांधल्या म्हणजे घर होत नाही. चार भिंतीआड संसार हवा, मग ते घर. नेताजी म्हणाले, अरे तान्या आता त्या मंत्री नाहीत अन खासदारही नाहीत. . त्या बेरोजगार आहेत. एक गीत आहे ‘दुखी मन मेरे, सून मेरा कहना. जहाँ नहीं चैना, वहाँ क्यू रहना.’ राहुल गांधींना पराभूत करणे भाजपाचे मिशन होते. ते पूर्ण झाल्यानंतर स्मृतींना कोण डोक्यावर घेणार? भाजपाच्या ठायी त्या नापास आहेत. अमेठीतील त्यांचे कार्यकर्ते गाण्यातून विचारतात ‘एक चतुर नार, कर के सिंगार, मेरे मन के द्वार घुसत जात, हम मरत जात.’
तानाजी म्हणाला, नेताजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देणाऱ्या निर्मला सीतारामन यांना पुन्हा अर्थमंत्री बनविले आणि स्मृतीला ते विसरले. त्यांची उपयुक्तता आता संपली आहे. घर विकणे आहे अशी पाटी स्मृतींच्या घरावर लवकरच दिसेल अशी अमेठीत चर्चा आहे. बघू आता काय होते ते.