सुनयना सोनवणे/पुणे: या वर्षीची दिवाळीफक्त प्रकाश आणि रंगांनी नव्हे, तर सुगंधाने उजळली आहे. पारंपरिक मातीचे दिवे आणि रंगीबेरंगी लायटिंगसोबतच आता सुगंधी मेणबत्या सणाच्या सजावटीचा नवा ट्रेंड बनल्या आहेत. प्रत्येक घरात आता प्रकाशासोबत मोहक सुवास दरवळत असून, बाजारपेठेत सेंटेड कँडल्सची विक्री झपाट्याने वाढत आहे.
ग्राहकांच्या पसंतीस नव्या प्रकारांच्या मेणबत्या
या वर्षी बाजारात अनेक नवीन प्रकारच्या मेणबत्याउपलब्ध झाल्या आहेत. सोया वॅक्सपासून बनवलेल्या इको-फ्रेंडली कँडल्स, गुलाब, लॅव्हेंडर, चंदन, ऊद आणि व्हॅनिला या सुगंधांच्या थीम कलेक्शन्स, तसेच मिठाईच्या आकाराच्या आकर्षक मेणबत्या, ज्या गिफ्टिंगसाठी विशेष लोकप्रिय ठरल्या आहेत.
सुगंधात गुंफलेला उत्सवभाव
ग्राहकांमध्ये यंदा सर्वाधिक मागणी ऊद, चंदन आणि व्हॅनिला या सुगंधांच्या मेणबत्यांची आहे. “व्हॅनिला आणि मसाल्यांचा सुगंध थंड हवेत उबदारपणा आणतो, तर चंदन आणि ऊद घरात शांतता आणि पारंपरिक भाव निर्माण करतात, असे विक्रेते सांगतात.
ऑनलाईन खरेदीतही लक्षणीय वाढ झाली आहे. विक्रेत्यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्राहकांना नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या, धूररहित आणि पुनर्वापरयोग्य पॅकेजिंग असलेल्या कँडल्स अधिक आवडत आहेत.
सस्टेनेबल कँडल्सचा ट्रेंड
पर्यावरणपूरक उत्पादनांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. सोया वॅक्स, बीस्वॅक्स आणि कोकोनट वॅक्सपासून तयार केलेल्या मेणबत्या पारंपरिक पराफिनच्या तुलनेत कमी धूर आणि अधिक टिकाऊपणा देतात. हाताने बनवलेल्या आर्टिसनल कँडल्सही भेटवस्तू म्हणून लोकप्रिय होत आहेत.
वाढती बाजारपेठ
भारतातील मेणबत्ती बाजार २०२५ पर्यंत सुमारे ३३७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेझॉन, नायका, फ्लिपकार्टसह अनेक ऑनलाईन मार्केटप्लेसवर आणि स्थानिक व्यावसायिकांच्या इंस्टाग्राम पेजेस व वेबसाईट्सवर सेंटेड कँडल गिफ्ट सेट्सची विक्री उच्चांक गाठत आहे.
‘लोक आता फक्त दिवे लावून समाधानी राहत नाहीत. प्रत्येक खोलीला, प्रत्येक क्षणाला एक ‘मूड’ द्यायचा असतो. त्यामुळे मूड-बेस्ड सुगंधी मेणबत्याना अधिक मागणी येत आहे.’
‘पूर्वी मी दिवाळीत फुलं आणि अगरबत्ती वापरत असे. पण आता मला प्रत्येक खोलीला वेगळा सुगंध द्यायचा असतो. त्यामुळे मी प्रत्येक वर्षी नवीन सुगंधाच्या मेणबत्या घेत असते — या छोट्या गोष्टी सणाला खरोखर खास बनवतात.’
अस्मिता जाधव, ग्राहक
Web Title: Demand for scented candles increased significantly traditional lights during diwali navarashtra special