वाचनाला 'डिजिटल' पाठबळ (फोटो- istockphoto)
पुणे/प्रगती करंबळेकर: अवांतर वाचन हे आता केवळ छंद म्हणून न राहता, तर नव्या युगातील विचारप्रवृत्ती घडवणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. अभ्यासक्रमाच्या चौकटीपलीकडे जाऊन शेअर बाजार, करिअर, कथा, कादंबऱ्या, जीवनशैली अशा विविध विषयांवरील पुस्तकांना वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या वाचनसंस्कृतीला डिजिटल तंत्रज्ञानाचे मजबूत पाठबळ मिळू लागले सार्वजनिक ग्रंथालयांनी केलेल्या डिजिटलायझेशनमुळे वाचन अधिक सुलभ, सुसंगत आणि व्यापक झाले आहे. सार्वजनिक ग्रंथालयांचे हे डिजिटल रूपांतर केवळ तांत्रिक प्रगती नसून, समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. अवांतर वाचन आणि डिजिटल माध्यमांची सांगड लावून नव्या पिढीला सशक्त विचारांची दिशा देण्याचे काम या ग्रंथालयांमार्फत घडते आहे.
तरुणांच्या विचारप्रकियेवर सकारात्मक परिणाम
डिजिटायझेशनमुळे केवळ सुविधा वाढल्या नाहीत, तर शतकांपूर्वीच्या दुर्मीळ, ऐतिहासिक ग्रंथसंपदाही स्कॅन करून डिजिटल स्वरूपात जतन करण्यात आली आहे. हे साहित्य अभ्यासक, विद्यार्थी आणि वाचनप्रेमीसाठी अमूल्य ठरत आहे. पुणे वाचन मंदिराचे सहाय्यक ग्रंथपाल आदित्य साबणे यांनी सांगितले की, सध्या तरुणाई ‘गोष्ट पैशा पाण्याची’ या शेअर बाजार विषयावरील पुस्तकाला विशेष पसंती देते आहे. हे पुस्तक आर्थिक साक्षरतेसाठी उपयुक्त ठरते, तरुण वर्गाच्या विचारप्रक्रियेवर त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.
वाचनाला चालना
ग्रंथपाल साबणे पुढे सांगतात की. बाहेरील वाचकांकडून ९९% वेळा पुस्तके परत केली जात नाहीत. त्यामुळे केवळ पुण्यातील रहिवाशांनाच पुस्तके उधार देण्याचे धोरण ठेवण्यात आले आहे. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचनकट्टा’, कथा स्पर्धा, चर्चासत्रेसारखे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे वाचन ही केवळ सवय न राहता, ती एक सशक्त सांस्कृतिक चळवळ विकसित होत आहे.
वाचन प्रक्रिया सोपी
पुण्यातील नाना वाचन मंदिर, पुणे नगर वाचन मंदिर, टिळक स्मारक मंदिरातील ग्रंथालय, महात्मा फुले वाचनालय यांसारख्या संस्थांनी आपली सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. या ग्रंथालयांत डिजिटल किऑस्क, संगणक, इंटरनेट सेवा व स्वयंचलित नोंदणी यंत्रणा बसवण्यात आल्या असून, पुस्तक शोध, नोंदणी आणि परतावा या प्रक्रिया आता जलद आणि सोप्या झाल्या आहेत.
एका क्लिकवर लाखो पुस्तके
‘मीडिया कॉमन्स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक लाखांहून अधिक पुस्तके एका क्लिकवर कवर उपलब्ध असून, सुमारे १ ते १.५ हजार सक्रिय सदस्य आणि पुण्यातील ११ शाखांच्या माध्यमातून ही सेवा वाढवण्यात आली आहे. केवळ ३० रुपयांच्या मासिक वर्गणीमध्ये ही सुविधा मिळत असून, कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय ही सेवा चालवली जाते.