संग्रहित फोटो
पुणे/प्रगती करंबेळकर : यंदा महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यभरातील दिवाळी अंकांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील १८७ दिवाळी अंकांची निवड झाली असून यात पुण्यातून एकूण ८२ दिवाळी अंकांचा समावेश आहे. या अंकांची यादी सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना पाठवण्यात आली असून, वाचकांना विविध विषयांवरील समृद्ध वाचनसाहित्य सहज उपलब्ध होणार आहे.
ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, दिवाळी अंक हा मराठी वाङ्मयीन परंपरेचा अविभाज्य भाग असून, वाचकांची अभिरुची आणि विचारसंपन्नता वाढविण्यात या अंकांचे योगदान अनमोल आहे. अनेक सार्वजनिक ग्रंथालयांना दरवर्षी प्रश्न पडतो की कोणते दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावेत. त्या पार्श्वभूमीवर संचालनालयाने प्राप्त झालेल्या निवडक अंकांची यादी सर्व ग्रंथालयांना पाठवली आहे.
या यादीत छंद, उद्गार, मनशक्ती, डायबिटीस हृदयमित्र, योगासने, अपेक्षा, दुर्गाच्या देशातून, क्रिककथा, ग्रंथजगत, नवरंग रुपेरी, ग्रहसंकेत, योगसिद्धी, वार्षिक राशीभविष्य, भाग्यसंकेत, प्रसाद, भारत पर्यटन, भवताल, रुचिरा, मी, पुरुष उवाच, छावा, किशोर, साधना बालकुमार, युनिक पासवर्ड, चिकूपिकू, सुवासिनी, प्रपंच, माहेर, नवल, अनुभव, पुण्यभूषण, उत्तम अनुवाद, ऋतुपर्ण, लाडोबा, चपराक, माननीय, मोहिनी, भयकथा, निहार, छोटू अक्षरदान, गोंदण, सत्याग्रही विचारधारा, पद्मगंधा, ग्राहककाहित आदी विविध प्रकारच्या अंकांचा समावेश आहे.
या सर्व अंकांची माहिती आणि प्रकाशकांचा पत्ता यादीत दिल्याने वाचकांना इच्छित अंक सहज मिळू शकतील. संचालनालयाने नमूद केले आहे की, सार्वजनिक ग्रंथालयांनी या यादीतील तसेच स्थानिक पातळीवरील इतर लोकप्रिय अंक वाचकांच्या मागणीनुसार खरेदी करून ग्रंथालयात उपलब्ध करावेत. त्यामुळे वाचकसंख्या वाढेल आणि वाचनाची संस्कृती अधिक बळकट होईल.
दिवाळी अंकांच्या यादीत पुण्याचे वर्चस्व
या वर्षी जाहीर झालेल्या दिवाळी अंकांच्या यादीत पुणे शहरातील अंकांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे हे मराठी वाङ्मय निर्मितीचे आणि वाचन संस्कृतीचे केंद्र असल्याने येथून सर्वाधिक दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत. विविध विषयांवर काम करणाऱ्या अनेक प्रकाशन संस्था, लेखक आणि संपादकांच्या सक्रियतेमुळे पुणे शहराने यादीत वर्चस्व राखले आहे.
दिवाळी अंक परंपरेचा पुनर्जागरण प्रयत्न
कोरोना महामारीनंतर दिवाळी अंकांची परंपरा काहीशी मंदावली होती. अनेक प्रकाशकांना या अंकांमुळे व्यावसायिक दृष्ट्या फारसा परतावा न मिळाल्यामुळे आता केवळ परंपरा म्हणूनच त्यांचे प्रकाशन सुरू ठेवले जात आहे. कोरोनापूर्वी १२०० च्या आसपास दिवाळी अंक प्रकाशित व्हायचे परंतु आता त्याची संख्या कमी होऊन यंदा राज्यभर सुमारे ८०० दिवाळी अंक प्रकाशित झाले असून, काही प्रमुख संस्थांचे अंक अद्याप प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
विविध विषयांवर समृद्ध अंक
यंदाच्या दिवाळी अंकांमध्ये सामाजिक, आर्थिक, आरोग्य, इतिहास, उद्योग, कृषी, पर्यावरण, चित्रपट, ग्रंथसाहित्य, ज्योतिष, धार्मिक पर्यटन, पाककला, बालसाहित्य, रहस्यकथा, राजकारण, सांस्कृतिक व मराठी भाषेवरील विषयांना विशेष स्थान आहे. विशेष म्हणजे, महिला विशेषांक, ललित वाङ्मय आणि विनोदी साहित्याचा वाटा यंदा अधिक असून, ‘पुरुष उवाच’ हा पुरुषांच्या प्रश्नांवर आधारित अंक, ‘दक्षता’ हा पोलिसांच्या विषयावर आधारित अंक, ‘मी’ नावाचा पाणी विशेषांक आणि ‘पुण्यभूषण’ हा पुणे शहरावर आधारित अंक हे विषय अनोखे आहेत.
क्रीडा विषयक अंकांचा अभाव
या वर्षी क्रीडाविषयक दिवाळी अंकांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. वाचकांमध्ये क्रीडा विषय लोकप्रिय असला तरी लेखन करणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने या विषयावरील अंक कमी प्रमाणात प्रकाशित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वाचनसंस्कृतीला चालना
ग्रंथालय संचालनालयाच्या या उपक्रमामुळे वाचकांना योग्य आणि विविध विषयांवरील दर्जेदार वाचनसाहित्य निवडणे सोपे होणार आहे. एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली दिवाळी अंकांची यादी ग्रंथालयांना तसेच वाचकांना दिशा देणारी ठरेल.