15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा 'या' ५ ऐतिहासिक घटनांची रंजक कथा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Independence Day 2025 : १५ ऑगस्ट हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि राष्ट्रभक्तीचा दिवस आहे. १९४७ मध्ये याच दिवशी भारताने ब्रिटिश साम्राज्याच्या साखळ्या तोडून स्वतःचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकवला. स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांच्या, त्यागाच्या आणि संघर्षाच्या कहाण्या त्या क्षणी नव्या भविष्याकडे वळल्या. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? हा दिवस फक्त भारताच्या इतिहासासाठीच नाही, तर जगाच्या इतिहासातही काही मोठ्या आणि निर्णायक घटनांनी सुवर्णाक्षरात नोंदवला गेला आहे. चला तर, १५ ऑगस्टच्या त्या जागतिक क्षणांमध्ये डोकावूया.
१५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानचे सम्राट हिरोहितो यांनी रेडिओवरून जगाला कळवले की जपान मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करत आहे. या घोषणेने दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती निश्चित झाली. ‘विजय-जपान दिन’ म्हणून हा दिवस ओळखला जातो. लाखो जीव गिळणाऱ्या युद्धानंतर हा क्षण जागतिक शांततेकडे टाकलेले निर्णायक पाऊल होता.
३५ वर्षांच्या जपानी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर, १५ ऑगस्ट १९४८ रोजी दक्षिण कोरियाची अधिकृत स्थापना झाली. अमेरिकेच्या पाठिंब्याने ‘कोरिया प्रजासत्ताक’ अस्तित्वात आले. कोरियन जनता हा दिवस आपल्या स्वातंत्र्यदिनाप्रमाणे साजरा करते.
हे देखील वाचा : 79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी
१५ ऑगस्ट १९६० रोजी काँगोने ८० वर्षांच्या फ्रेंच राजवटीला पूर्णविराम देत स्वातंत्र्याची घोषणा केली. आफ्रिकन खंडातील स्वातंत्र्य लाटेचा हा एक महत्वाचा टप्पा ठरला. या स्वातंत्र्याने इतर आफ्रिकन राष्ट्रांना प्रेरणा दिली.
१९७१ साली याच दिवशी बहरीनने युनायटेड किंग्डमपासून स्वतंत्र होण्याची घोषणा केली. आखाती देशांमधील तेल शोध, व्यापार आणि आर्थिक विकासामुळे बहरीन आज एक महत्त्वाचे राष्ट्र मानले जाते.
१५ ऑगस्ट १९७५ हा दिवस बांगलादेशासाठी काळा दिवस ठरला. देशाचे संस्थापक नेते शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या कुटुंबासह हत्या करण्यात आली. या दुःखद घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस आजही राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळला जातो.
हे देखील वाचा : Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा
भारतासाठी हा दिवस स्वातंत्र्याचा प्रतीक आहे, तर जगातील अनेक देशांसाठी तो बदल, संघर्ष, स्वप्नपूर्ती आणि कधी कधी दुःखद आठवणींचा दिवस आहे. इतिहासाच्या या संगमावर भारताचा तिरंगा फडकताना, जगाच्या इतर कोपऱ्यातही विविध ध्वज उंचावत होते, किंवा अश्रूंची धार वाहत होती.
१५ ऑगस्ट म्हणजे राष्ट्रांना स्वातंत्र्याच्या नव्या पहाटेचा अनुभव देणारा दिवस, आणि इतिहासाच्या पानांमध्ये सदैव तेजाने चमकणारा क्षण.