फोटो सौजन्य: गुगल
शिवरायांचं महानिर्वाण झालं आणि भोसले कुळाला सत्तेच्या वाळवीने पोखरायला सुरुवात केली. थोरल्या धन्याच्या देहांतानंतर सोयराबाईंनी आपला पुत्र राजारामास सिंहासनावर बसवण्यासाठी खेळी रचली. इथं रायगडी शिवरायांनी देहत्याग केला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले मात्र ही खबर राजाच्या पोटच्या गोळ्याला कोणी दिली देखील नाही. रायगडावरवरुन सैन्य आलं पन्हाळगडाच्या पायथ्याशी पण ते शंभूराजाचं मायेचं छत्र हरपलं हे सांगायला नाही तर राणीचं फरमान सांगायला.म्हणजेच सोयरा बाईंनी सैन्य पाठवलं पन्हाळ्याच्या वाटेला बरोबर सरसेनापती हंबीरराव देखील होते. अष्टप्रधान मंडळातील जाणकार देखील होते. हे सांगायला की शंभूराजाला कैद करण्यात येत आहे. मात्र बहिणीचा आदेश झुगारुन सरसेनापतींनी स्वराज्याबाबतचं कर्तव्य पार पडलं. अष्टप्रधान मंडळाच्या सोयराबाईंना आदेशाला झुगारुन सरसेनापतींनी शंभूराजाला साथ दिली.
शिवरायाच्या पश्चात सिंहासनावर बसण्याचा हक्क आणि अधिकार होते ते शंभूराजांचे आणि तो दिवस ठरला 16 जानेवारी 1681 हा दिवस शंभूराज्याभिषेकाचा मुहुर्त ठरला. मात्र याआधी देखील अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. शिवरायांच्या महानिर्वाणानंतर, जवळपास 9 महिन्यांनी शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. या दरम्यानच्या काळात स्वराज्याची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रयतेच्या कल्याणाच्या योजना राबवण्यात आणि युद्धाची तजवीज करण्यातच निघून गेला. .या सगळ्या माहितीवरुन हे लक्षात येतं की शंभूराजेंना छत्रपती होण्याची घाई नव्हती. मात्र तरीही रयतेच्या कल्याणासाठीची कर्तव्य नेटाने पार पडण्यात धाकल्या धन्याने कोणतीही उणीव ठेवली नाही.
राज्याभिषेकाचा दिवस निश्चित झाल्यावर राजांनी पुरोहित म्हणून गागाभट्टांची निवड केली. याच कारण म्हणजे काही समाजकंटकांनी राजांची प्रतीमा मलीन करण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणताही ब्राम्हण राज्याभिषेकाच्या सोहळ्याचं पौरोहित्य घेण्यास धजावत नव्हते. त्यामुळे काशीला असलेल्या गागाभट्ट यांच्या शिवाय मार्ग नव्हता. राजांनी खंडो बल्लाळ या विश्वासू सहकार्याला काशीला पाठवले. मात्र गागाभट्ट यांची भेट होण्याआधीच त्यांच्या मनात कोणीतरी राजांविषयी विष पेरलं. शिवाजीचा मुलगा संभाजी धर्माला अनुसरुन वागत नसल्याचा कागाळ्या उठवल्या होत्या. त्यामुळे गागाभट्ट यांनी पौरोहित्य घेण्यास नकार दिला. शंभूराजाची एकमेव आशा देखील धुळीला मिळाली.
त्याचवेळी राजाने स्वराज्याचं नवं तोरण बांधण्याचा विडा हाती घेतला. आपला हा मनसुबा राजांनी विश्वासू सहकार्यांबरोबर मांडला. आणि राज्याभिषेकासाठी शिलंगणाचे सोनं लुटण्यासाठी सुरतेची निवड केली. राजांच्या आदेशानुसार हंबीररावांनी आखणी केली. हा मनसूबा सगळ्या नेतेमंडळींसमोर मांडण्यात आला. ही खबर मोघलांना मिळाली. ती मिळावी हाच शंभूराजांचा गनिमी कावा होता. मुघलांचं सैन्य जेव्हा सुरतेच्या दिशेने रवाना झालं. तेव्हा राजांनी बुऱ्हाणपूर लुटलं. सुरतेला हंबीरराव तर बुऱ्हाणपुरात शंभूराजे इकडे आड आणि तिकडे विहिर अशी गती झाली औरंबजेबाच्या सैन्याची. पाच दिवस विश्रांती न घेता राजांनी रायगडावरुन बुऱ्हाणपूर कमी दिवसात गाठलं. स्वराज्याची मुघलांनी लुटलेली लक्ष्मी धाकल्या धन्यानं स्वराज्यात परत आणली आणि मगच स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतला.
शिवरायांच्या महानिर्वाणानंतर, शंभूराजा रयतेचा बाप आणि माय दोन्ही झाला. अंगात दहा हत्तीचं बळ, वाघाचं काळीज असलं तरी रयतेसाठी अपार माया असलेल्या या थोर पराक्रमी राजाला नवराष्ट्रचा मानाचा मुजरा…
(सदर लेख हा नवराष्ट्रच्या तेजोत्सव स्वराज्याचा छावा या मासिकातल्या संदर्भावरुन लिहिला आहे.)






