Blue Indian Cricket Jersey
भारतीय क्रिकेट संघाची निळी जर्सी म्हणजे आज फक्त एक ओळख नाही, तर ती भारतीय चाहत्यांसाठी एक भावना आहे. “मेन इन ब्ल्यू” म्हणून ओळखले जाणारे हे खेळाडू जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा राहतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का ?… नेमकं हा निळा रंगच का?
ही कहाणी आहे 1980 च्या दशकातील. त्या काळी वनडे क्रिकेट अजून नवीन होतं आणि सर्व संघ पांढऱ्या कपड्यांमध्येच खेळायचे. पण 1980 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या Benson & Hedges World Series Cup मध्ये पहिल्यांदाच रंगीत कपडे, पांढऱ्या चेंडू आणि काळे sight screen वापरण्याचा प्रयोग झाला. या तिन्ही गोष्टींनी क्रिकेटचा चेहरामोहरा कायमचा बदलला.
त्या काळात कोणत्याही संघाचे अधिकृत किट स्पॉन्सर नव्हते. त्यामुळे आयोजक म्हणजे ऑस्ट्रेलियालाच सर्व संघांना कपडे पुरवावे लागत होते. ऑस्ट्रेलियाने आपला पारंपरिक पिवळा रंग निवडला. न्यूझीलंडला क्रीम आणि चॉकलेटी रंगाचे कपडे दिले गेले. आणि भारतासाठी निवड झाली लाईट ब्लू आणि पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनची. हा रंग ना बीसीसीआयने निवडला होता, ना खेळाडूंनी. तो केवळ आयोजकांनी ठरवला होता.
मात्र जेव्हा भारतीय खेळाडू या निळ्या कपड्यांमध्ये मैदानावर उतरले, तेव्हा तो रंग इतका उठून दिसला की पुढे भारताने तोच रंग आपली ओळख म्हणून कायम ठेवला. 1980 नंतर टीम इंडियाची जर्सी वेळोवेळी बदलत गेली.1992 च्या वर्ल्डकपमध्ये गडद नेव्ही ब्ल्यू, 1996 मध्ये तिरंगी पट्ट्यांसह डिझाईन, 2003 मध्ये हलका आकाशी रंग, तर 2011 च्या वर्ल्डकपमध्ये तेजस्वी इलेक्ट्रिक ब्लू रंग दिसला.
आजही प्रत्येक वर्ल्डकपमध्ये किंवा द्विपक्षीय मालिकेत बीसीसीआय आणि किंवा सध्याचे स्पॉन्सर नवीन डिझाईन सादर करतात, पण रंग मात्र बदलत नाही, निळाच!
काहीजण म्हणतात हा रंग अशोक चक्र आणि बीसीसीआयच्या लोगोतील निळ्या रंगावरून प्रेरित आहे. निळा रंग शांततेचं, स्थिरतेचं आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच तो भारतीय क्रिकेटच्या आत्म्याशी जुळतो.
1990 च्या दशकात जेव्हा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे सारखे दिग्गज खेळाडू चमकू लागले, तेव्हा “Men in Blue” ही संज्ञा लोकप्रिय झाली. ती केवळ जर्सीची नाही, तर एका पिढीच्या भावना व्यक्त करणारी ओळख बनली.
आज जेव्हा टीम इंडिया मैदानात निळ्या जर्सीत उतरते, तेव्हा ती जर्सी फक्त एक कपडा नसते, ती 40 वर्षांची परंपरा, अभिमान आणि असंख्य विजयांची साक्ष असते.






