(फोटो सौजन्य: सुनयना सोनावणे)
सुनयना सोनवणे : कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना गायत्री आणि तिच्या मित्र-मैत्रिणींसमोर एक प्रश्न सतत उभा राहत होता तो म्हणजे वाढत्या कचऱ्याचं करायचं काय? घरातील टाकाऊ कपडे, कागद, कॉलेजच्या आवारातील वाळलेली झाडांची पाने अशा अनेक समस्या त्यांच्या समोर होत्या. केवळ चर्चा करून थांबण्याऐवजी त्यांनी आपल्या सर्जनशील विचारांना कृतीत उतरवण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी जुन्या कपड्यांपासून छोट्या हँडपर्स ते टोट बॅगपर्यंत विविध कापडी पिशव्या बनवण्याचा छोटासा प्रयोग सुरू केला. त्यासोबतच कागदाचा पुनर्वापर करून हँडमेड पेपर तयार करणे, त्यावर आकर्षक पेंटिंग करणे, वाळलेल्या पानांचा कल्पकतेने वापर करून डायरीचे कव्हर बनवणे अशा अनेक छोट्या गोष्टींना त्यांनी आकार दिला. या छोट्याशा कल्पनेतूनच त्यांचा स्टार्टअप उभा राहिला आणि आज तो ग्राहकांना अनेक पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध करून देत आहे.
ही केवळ गायत्रीची गोष्ट नाही; आज देशभरातील अनेक तरुण आपल्या कलागुणांना, नव्या कल्पनांना आणि समस्यांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याच्या वृत्तीला व्यवसायाचे रूप देत आहेत.
दरवर्षी २१ एप्रिल रोजी साजरा होणारा ‘जागतिक सर्जनशीलता आणि नवोन्मेष दिन’ हा दिवस नव्या कल्पना, संशोधन आणि सर्जनशील उपायांच्या माध्यमातून जागतिक आव्हानांना तोंड देण्याची प्रेरणा देतो. संयुक्त राष्ट्र महासभेने २०१७ मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. समस्या निराकरण, आर्थिक प्रगती आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कल्पकतेचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. यंदा ‘जागतिक प्रगतीसाठी सर्जनशीलतेचा उपयोग’ आणि ‘पुढे येऊन नवनिर्मिती करा’ या संकल्पनांवर विशेष भर देण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर सर्जनशील अर्थव्यवस्था ही सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक मानली जाते. जागतिक जिडीपीमध्ये या क्षेत्राचा ३.१ टक्के वाटा असून, जगातील ६.२ टक्के रोजगार या क्षेत्रातून निर्माण होतात. त्यामुळे रोजगारनिर्मिती, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक जतन यासाठीही सर्जनशीलता अत्यंत महत्त्वाची ठरते.
या दिनाचा संबंध संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (एसडीजी) देखील जोडला जातो. विशेषतः ‘सभ्य रोजगार व आर्थिक वाढ’ (एसडीजी ८), ‘उद्योग, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधा’ (एसडीजी ९) आणि ‘जबाबदार उपभोग व उत्पादन’ (एसडीजी १२) या उद्दिष्टांना गती देण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण ठरतो.
आजच्या तरुणांसाठी सर्वात मोठी संधी म्हणजे समस्यांकडे केवळ अडथळा म्हणून न पाहता, त्यातून नव्या शक्यता शोधणे. प्रत्येक अडचणीत एक नवीन कल्पना दडलेली असते आणि त्या कल्पनेला कृतीची जोड मिळाली, तर ती फक्त वैयक्तिक यशापुरती मर्यादित राहत नाही, तर समाजाच्या शाश्वत विकासाचा मार्ग ठरते. नवोन्मेषामुळे तंत्रज्ञानासह डिझाईन, माध्यम, कला, शिक्षण, सादरीकरण आणि उद्योग क्षेत्रातही व्यापक प्रगती घडून येते.
सृजन क्रिएशन्सच्या संस्थापक गायत्री पोदार यांचा हा प्रवास कधीच सोपा नव्हता. आर्थिक अडचणी, संसाधनांची कमतरता, अपयशाची भीती आणि सामाजिक मर्यादा या अडथळ्यांवर मात करत आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत. मात्र, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कल्पना वास्तवात बदलू शकते असे त्या म्हणतात.
Light Pollution : भारत-चीनचा विकास की धोका? दोन देशांमुळे बिघडतोय पृथ्वीचा समतोल?






