मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी (फोटो - istcok)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा कडक ऊन तर नंतर वातावरणात गारवा अनुभवायला मिळत आहे. त्यातच राज्यातील काही भागांत गारांचा पाऊसही झाला. त्यामुळे हवामान आणखीनच बदलल्याचे पाहिला मिळत आहे. असे असताना आता हवामान विभागाने पुढील 3 तासांत मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाणे येथे येथील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
काही दिवसांपूर्वीच पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शेती पिक धोक्यात आली. सतत पाऊस पडत असल्याने नुकसान होत आहे. राज्यावर दुहेरी संकट आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती बघायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेचाही मोठा इशारा देण्यात आला. यासोबतच पुढील 3 तासात मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर येथील काही भागात जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाट पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वीही वर्तवला आहे पावसाचा अंदाज
दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता दोन दिवसांपूर्वीच वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकऱ्यांनाही हवामान विभागाकडून सल्ला
दरम्यान, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.






