World Football Day Special: गरिबी, नकार आणि संघर्षातून झळकलेला तारा ‘Cristiano Ronaldo’ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Football Day Special : आज ‘वर्ल्ड फुटबॉल डे’ निमित्ताने जगभरातील फुटबॉलप्रेमी आपल्या आवडत्या खेळाडूंना स्मरतात. अशाच एका खेळाडूची गोष्ट आहे, ज्याने गरिबी, नकार, अपमान, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक मर्यादा झुगारून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू होण्याचा प्रवास केला तो म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो.
आज रोनाल्डो केवळ एक फुटबॉलपटू नसून एक जागतिक ब्रँड बनला आहे. त्याचे इंस्टाग्रामवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या एका पोस्टसाठी तो कोट्यवधी रुपये कमावतो. पण यशाची ही शिडी त्याने सहज चढलेली नाही. त्याचा प्रवास संघर्षांचा आहे, दुःखाने भरलेला आहे, आणि त्यामुळेच प्रेरणादायी ठरतो.
रोनाल्डोचा जन्म पोर्तुगालमधील मेडिरा बेटावर एका गरीब कुटुंबात झाला. तो चौथा आणि अनपेक्षित मुलगा होता. त्याची आई डोलोरेसने तिच्या आत्मचरित्रात स्पष्टपणे लिहिले आहे की तिला हा गर्भ ठेवायचा नव्हता. तिने गर्भपातासाठी प्रयत्न केला, पण देवाच्या इच्छेने तो थांबवला गेला. आज रोनाल्डो हसून आईला म्हणतो, “बघ आई! तू मला नकोसे समजले होतेस आणि आता मीच सगळ्यांची जबाबदारी घेतो.”
त्याचे वडील जोस डिनिस हे माळी होते आणि मद्यपानामुळे व्यसनाधीन झाले होते. आई डोलोरेस इतरांच्या घरात जेवण बनवून कुटुंब चालवायची. एक खोली, टिनच्या छप्पराखाली राहणारे हे पाच जणांचे कुटुंब गरिबीचा सामना करत होते. खेळणी, नाताळाच्या भेटी यांचा त्याला स्पर्शही झाला नव्हता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, भारताच्या ‘S-400’ ने पाकच्या AWACS चा उडवला धुवा; रचला विश्वविक्रम
शाळेतील अभ्यासात रोनाल्डो फारसा रमला नाही. तो नेहमी रडायचा आणि त्याचे मित्र त्याला ‘रोंडू’ म्हणायचे. मात्र त्याच्या धावण्याचा वेग आणि चपळतेमुळे त्याचे लक्ष फुटबॉलकडे वळले. वयाच्या आठव्या वर्षी त्याने स्थानिक संघासाठी खेळायला सुरुवात केली. त्याच्या खेळामुळे लवकरच त्याची निवड आंतरराष्ट्रीय अंडर-१७ संघात झाली.
आईने १८ वर्षांपर्यंत त्याची आर्थिक जबाबदारी सांभाळली. २००३ मध्ये अवघ्या १८ व्या वर्षी मँचेस्टर युनायटेड या इंग्लिश क्लबने त्याच्याशी १७ दशलक्ष डॉलर्सचा करार केला आणि रोनाल्डोने मागे वळून पाहिलेच नाही. पुढे तो रिअल माद्रिद, युव्हेंटस, आणि अल-नस्र सारख्या नामांकित क्लब्ससाठी खेळला. आज त्याची एकूण संपत्ती ४६० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३३ अब्ज रुपये) इतकी आहे. २०२० मध्ये त्याने एकट्याने ८५० कोटी रुपयांची कमाई केली. इंस्टाग्रामवर एका पोस्टमधून तो ७ कोटी रुपये कमावतो.
अविवाहित असूनही रोनाल्डो चार मुलांचा पिता आहे. त्याचे अनेक महिलांशी संबंध राहिले असून त्याने केवळ एका मैत्रिणीसोबत सहजीवन स्वीकारले जॉर्जियाना रॉड्रिग्ज, जी एक स्पॅनिश मॉडेल आहे. त्याला तीन मुलं आणि एक मुलगी असून त्याने त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी उचललेली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पुन्हा सुरु झालं ट्रम्पच टॅरिफ नाटक; आयफोनसह सर्व परदेशी स्मार्टफोनवरही आकारला पुन्हा नवा कर
‘गरिबी ही अडथळा नसून प्रेरणा असते’, हे रोनाल्डोच्या आयुष्यातून शिकण्यासारखे आहे. आईला नको असलेला, एका खोलीत वाढलेला हा मुलगा आज करोडोंचं प्रेम, संपत्ती आणि यश मिळवून जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. World Football Day च्या निमित्ताने रोनाल्डोचा हा जीवनप्रवास प्रेरणादायी ठरतो.