 
        
        अभिषेक नायर(फोटो-सोशल मीडिया)
Abhishek Nair appointed as KKR head coach : इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम २०२६ मध्ये रंगणार आहे. त्यापूर्वी आयपीएलची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामासाठी डिसेंबर २०२६ मध्ये लिलाव पार पडणार आहे. याआधी काही संघांच्या सपोर्ट स्टाफमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. आयपीएलचे तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सनेही कोचिंग टीममध्ये बदल केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा आणि तीन हंगामात मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या चंद्रकांत पंडित यांचे मार्ग वेगळे झाले होते. त्यामुळे आता कोलकाताने अभिषेक नायर या नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर आता आयपीएल २०२६ पासून कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. अभिषेक गेल्या अनेक वर्षांपासून या संघासोबत आहे. अभिषेकला प्रशिक्षकपदाचा अनुभवही आहे. तो भारतीय संघाचाही साधारण ८ महिने सहाय्यक प्रशिक्षक होता. ४२ वर्षीय नायर गेल्या ५ वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिला आहे. तो यादरम्यान भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक असताना मात्र कोलकाता संघापासून दूर होता. पण सहाय्यक प्रशिक्षकपद सोडल्यानंतर तो पुन्हा आयपीएल २०२५ दरम्यान, कोलकाता संघात परतला होता. त्याने कॅरेबियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्सचेही मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे. नायर हा भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा चांगला मित्र आहे. त्याने नुकतेच गेल्या काही महिन्यात रोहितला ११ किलो वजन कमी करण्यासाठी मदतही केली होती.
त्याने १०३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५७४९ धावा केल्या आणि १७३ विकेट्स घेतल्या. तसेच ९९ लिस्ट ए क्रिकेटमध्ये २१४५ धावा केल्या आहेत आणि ७९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ९५ टी२० सामने खेळले असून १२९१ धावा केल्या आहेत आणि २७विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाताच्या कोचिंग टीममध्ये ड्वेन ब्रावो मेंटॉर आहे. मात्र कोलकाताला गोलंदाजी प्रशिक्षकही शोधावा लागणार आहे. कोलकाताने २०२४ मध्ये चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. मात्र आयपीएल २०२५ मध्ये संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नव्हती.
इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सने संघबांधणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयपीएल २०२५ पूर्वी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अंबानी यांच्या फ्रँचायझीला अपेक्षित संघ बांधता आला नाही. पण, आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी एमआयने कंबर कसली आहे. पण, पुन्हा एकदा रोहित शर्मा भवती चर्चा येऊन थांबली आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार केलं, तेव्हाही रोहित मुंबई इंडियन्सची साथ सोडतोय अशी चर्चा होती. आता रोहितचा खास मित्र अभिषेक नायर केकेआरचा कोच झाल्याने रोहित फ्रँचायझी बदलाची चर्चा रंगली आहे






