विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी अभिषेक शर्मा सज्ज! (Photo Credit - X)
IND vs AUS T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच संपली आहे. आता दोन्ही संघ २९ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहेत, ज्याची सुरुवात कॅनबेरा येथील मनुका ओव्हलवर होणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असेल.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये डावखुरा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची (Abhisekh Sharma) कामगिरी सर्वाधिक चर्चेत होती. आता, सर्वांचे लक्ष ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अभिषेकच्या कामगिरीवर असेल, कारण त्याला या मालिकेत विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अभिषेक शर्माने प्रभावी फॉर्म दाखवला आहे. त्याने २४ सामन्यांमधील २३ डावांमध्ये ३६.९१ च्या सरासरीने ८४९ धावा केल्या आहेत. अभिषेकला आता १०,०० आंतरराष्ट्रीय टी-२० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त १५१ धावांची गरज आहे.
अभिषेक शर्माने नुकत्याच झालेल्या २०२५ च्या आशिया कपमध्ये तुफानी फलंदाजी केली. त्याने सहा डावांमध्ये ४४ च्या सरासरीने ३१४ धावा केल्या होत्या, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट २०० च्या जवळपास होता. २०२५ या संपूर्ण वर्षातील त्याची कामगिरी खूपच प्रभावी आहे. त्याने १२ डावांमध्ये फलंदाजी करताना ४९.४१ च्या सरासरीने ५९३ धावा केल्या आहेत, ज्यात २०० हून अधिकचा स्ट्राइक रेट, ४१ षटकार आणि ५६ चौकारांचा समावेश आहे. त्यामुळे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो विराटचा विक्रम मोडतो की नाही, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहील.






