रोहित शर्माच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची चिंता (Photo Credit- X)
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात झालेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच (२५ ऑक्टोबर) सिडनी येथे संपली. तिसरा सामना टीम इंडियाने ९ विकेट्सने जिंकला असला तरी, मालिकेत भारताला १-२ ने पराभव पत्करावा लागला. या अंतिम सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) (नाबाद १२१) आणि विराट कोहली (नाबाद ७४) यांच्या बॅटमधून दमदार खेळी पाहायला मिळाली. या मालिकेत रोहितने एकूण २०२ धावा केल्या. मात्र, मालिका संपल्यानंतर मायदेशी परतताना रोहित शर्माने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर झाला तेव्हा रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले होते. तेव्हापासूनच रोहित एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सिडनी वनडेत दमदार शतक ठोकून रोहितने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
One last time, signing off from Sydney 👊 pic.twitter.com/Tp4ILDfqJm — Rohit Sharma (@ImRo45) October 26, 2025
मात्र, आता वनडे मालिका संपवून सिडनीहून देशात परतताना रोहितने विमानतळावरील आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले आहे: “सिडनीला शेवटचा निरोप”. रोहितच्या या भावनिक पोस्टने त्याच्या भविष्यातील एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल संशय निर्माण केला आहे.
सिडनी वनडेमध्ये नाबाद १२१ धावांची शानदार खेळी केल्यानंतर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियातील चाहत्यांचे आभार मानले होते. त्यावेळी तो म्हणाला होता, “मला खात्री नाही की आम्ही (क्रिकेटर म्हणून) येथे पुन्हा परत येऊ की नाही, पण मला येथे खेळण्याचा खूप आनंद मिळाला. गेल्या १५ वर्षांत जे काही झाले ते विसरून जा, मला नेहमीच येथे खेळायला आवडले आहे.” दरम्यान, टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका नोव्हेंबरच्या अखेरीस आहे आणि या मालिकेत रोहित शर्मा खेळण्याची पूर्ण शक्यता आहे.






