भारत वि इंग्लंड(फोटो-सोशल मीडिया)
Alastair Cook’s comments about the Indian team : अनुभवी फलंदाज अॅलिस्टर कुकचे विधान सध्या चर्चेत आले आहे. इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूने, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ, ज्याने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती, तो भारतीय संघ मजबूत नसल्याचे म्हटले आहे. कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने पहिल्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत, चार शतकांच्या मदतीने ७५४ धावा फटकावल्या. कुक म्हणाला की, भारतीय संघ फारसा मजबूत नसल्याने इंग्लंड मालिका अनिर्णित राहू शकला आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान कुक म्हणाला की, “इंग्लंड संघ व्यवस्थापन भारताविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीबद्दल बोलत असून त्यांनी भारताविरुद्ध मालिका अनिर्णित राखली आहे. परंतु, हाच भारतीय संघ त्यांच्याच भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वाईटरित्या पराभूत झाला. त्यामुळे, इंग्लंडचा दौरा करणारा भारतीय संघ सर्वोत्तम भारतीय संघ नव्हताच.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांत पराभव स्वीकारणारा इंग्लंड संघ अॅशेस पुन्हा मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर २०११ पासून इंग्लंड संघाने प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या चौथ्या अॅशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेटने दणदणीत पराभव केला आहे. इंग्लंडसमोर विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
१७५ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेटने इंग्लंड संघाला ५१ धावांची भक्कम सुरुवात करून दिली. डकेट २६ चेंडूत ३४ धावा काढून बाद झाला. तर क्रॉलीने ३७ धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांव्यतिरिक्त, जेकब बेथेलने ४० धावा करून संघाचा मालिकेतील पहिला विजय निश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. तर हॅरी ब्रूक १८ आणि जेमी स्मिथ ३ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडने ६ विकेट गमावून १७८ धावा करून सामना आपल्या खिशात टाकला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात १५२ धावाच करू शकला. इंग्लंडकडून जोश टोंगने पाच बळी घेतले. मेलबर्न कसोटीचा निर्णय १४२ षटकांतच लागला. यादरम्यान ३६ विकेट्स पडल्या.






