आशिया चषक 2023 : आशिया चषक आतापर्यत १५ वेळा आयोजित करण्यात आला आहे. दोन वेळा टी-२० फॉरमॅट सीजन वगळले तर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये १३ वेळा आयोजित करण्यात आला आहे. या १३ हंगामामध्ये या स्पर्धेत किती खेळाडूंनी आपली क्षमता दाखवली आहे हे माहिती नाही. परंतु सध्या अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूंची आकडेवारी तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. आशिया कपमधील टॉप ५ फलंदाज आणि टॉप ५ गोलंदाजांची रोचक आकडेवारी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. आशिया चषकामधे सर्वाधिक धावा करणाऱ्याच्या यादीमध्ये दोन भारतीय, दोन श्रीलंकेचे आणि एक पाकिस्तानी खेळाडूचा समावेश आहे. या शर्यतीत सनथ जयसूर्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. जयसूर्याने १९९० ते २००८ पर्यंत खेळताना १२२० धावा केल्या होत्या. त्याने २५ सामन्यांमध्ये ५३.०४ च्या सरासरीने आणि १०२.५२ च्या स्ट्राईक रेटने ६ शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत.
जयसूर्यानंतर त्यांचा देशबांधव कुमार संगकारा आहे. संगकाराने २००४ – २०१४ या कालावधीमध्ये २४ सामन्यांमध्ये ४८.८६ च्या सरासरीने १०७५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांच्या ४ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९९० ते २०१२ पर्यत खेळताना सचिनने २३ सामन्यात ५१.१० च्या सरासरीने ९७१ धावा केल्या आहेत. या शर्यतीत पाकिस्तानचा शोएब मलिक चौथ्या क्रमांकावर आहे. शोएबने २००० ते २०१८ पर्यत १७ सामन्यात ३ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. त्यांनी ७८६ धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत रोहित हा एकमेव खेळाडू आहे जो अजूनही एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. रोहितने २२ सामन्यात ४५.५६ च्या सरासरीने ७४५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने २२ सामन्यांमध्ये ६ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.
आशिया कपमधील सर्वात्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाच्या यादीमध्ये एकही सक्रिय खेळाडू नाही. या यादीमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखले असून, ५ पैकी ४ श्रीलंकेचे खेळाडू आहेत. गोलंदाजांमध्ये मुथय्या मुरलीधरन सर्वोत्तम कामगिरी करणारा आहे. मुरलीधरनने १९९५ ते २०१० पर्यंत खेळताना २४ सामन्यात ३० विकेट घेतल्या. या काळात त्यांची अर्थव्यवस्था ३.७५ होती. तर लसिथ मलिंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २००४ ते २०१८ या कालावधीमध्ये १४ सामने खेळले आहेत यामध्ये त्याने २९ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा मेंडिसचा क्रमांक लागतो. मेंडिसने २००८ ते २०१४ या कालावधीत आशिया चषक स्पर्धेत भाग घेतला होता, त्यादरम्यान त्याने केवळ ८ सामन्यांमध्ये १०.४२ च्या सरासरीने आणि ३.९८ च्या इकॉनॉमीने २६ विकेट घेतल्या होत्या.या यादीत पाकिस्तानचा सईद अजमल चौथ्या क्रमांकावर आहे. २००८ ते २०१४ दरम्यान अजमलने १२ सामने खेळले, ज्यात त्याने १९.४० च्या सरासरीने २५ विकेट घेतल्या. श्रीलंकेचा चमिंडा वास शेवटच्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. १९९५ ते २००८ पर्यंत त्याने १९ सामने खेळले आणि २७.७८ च्या सरासरीने २३ बळी घेतले.