अर्शदीप सिंग(फोटो-ओशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून आतापर्यंत चार सामने खेळवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाबाबत सांगायचं झालं तर भारताने १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध सामना जिंकून या स्पर्धेत विजयी सलामी दिली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. यावेळी संघात अंतिम ११ मध्ये अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली नाही. यामुळे भारतीय माजी दिग्गज फिरकीपटू आर आश्विनकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा भारतीय टी-२० संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. अर्शदीप सिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना ६३ सामन्यांमध्ये ९९ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. अर्शदीपला आशिया चषकासाठी भारतीय टी-२० संघात स्थान देण्यात आलं आहे. यूएईविरूद्ध पार पडलेल्या सामन्यात १ गडी बाद करताच त्याच्याकडे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठण्याची संधी होती. पण, या सामन्यात त्याला संधी दिली गेली नाही. यावरून आता अश्विनने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
या सामन्यातून अर्शदीप सिंगला बाहेर ठेवणे हे माजी खेळाडू अश्विनला पटलेले नाही. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना त्याने अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ मध्ये स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अश्विनने गंभीरवर जोरदार टीका करत म्हटले की, गंभीरच्या प्रशिक्षणाखाली अर्शदीपला संधी न मिळणे हा आता ट्रेंड बनत चालला आहे. अश्विन म्हणाला, अर्शदीपला वगळण्यात आले, हे आश्चर्यचकीत करणारे आहे, पण यात काही नवीन नाही. जेव्हापासून गंभीरने प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली आहे, तेव्हापासून हेच घडत आहे. अर्शदीप सिंग चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने खेळू शकला नव्हता. कदाचित दुबईतील परिस्थिती पाहता, ते फिरकी गोलंदाजांना अधिक प्राधान्य देत आहेत.
हेही वाचा : ‘विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध अग्निपरीक्षा’, मुख्य प्रशिक्षकांकडून आगामी रणनीती स्पष्ट
गंभीरने केकेआरसाठी जेतेपद जिंकले होते, त्यावेळीही त्याने फिरकी गोलंदाजीवर अधिक भर दिला होता. अर्शदीप सिंग नवीन चेंडूने गोलंदाजी करताना विकेट्स काढून देण्यासाठी ओळखला जातो. पण २०२५ मध्ये त्याला फार क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. यावर्षी त्याला भारतीय संघासाठी केवळ १ मालिका खेळण्याची संधी मिळाली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आधी इंग्लंडविरूद्ध झालेल्या ३ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ४ आणि एका वनडे सामन्यात त्याने २ गडी बाद केले होते. त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान दिले गेले होते.