अजित वाडेकर(फोटो-सोशल मीडिया)
Birthday Special : आज माजी क्रिकेटर दिवंगत अजित वाडेकर यांचा आज जन्म दिवस. 1 एप्रिल 1941 रोजी त्यांचा झाला. अजित वाडेकर हे आज हयात असते तर आज त्यांचा 85 वा वाढदिवस साजरा केला असता. प्रसिद्ध क्रिकेटर माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे 15 ऑगस्ट 2018 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. अजित वाडेकर यांचा जन्म मुंबई शहरात झाला. ते भारतीय संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आक्रमक फलंदाज तसेच एक उत्कृष्ट कर्णधार आणि भारतीय संघाचे यशस्वी प्रशिक्षक देखील राहिले आहेत.
अजित वाडेकर यांचा जन्म 1 एप्रिलला झाल्याची खंत त्यांना होती. आपल्या जन्माबाबत वाडेकर म्हणाले होते की, ‘या दिवशी इतरांना मूर्ख बनवण्याऐवजी लोकांनी मलाच मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला.’ भारताला सलग तीन कसोटी मालिका जिंकून देणारे अजित वाडेकर हे पहिले भारतीय कर्णधार ठरले होते. 1970-71 मध्ये वेस्ट इंडिजचा 1-0 (5) आणि 1971 मध्ये इंग्लंडचा 1-0 (3) असा पराभव केल्यानंतर, 1972-73 मध्ये भारत दौऱ्यावर त्यांनी इंग्लंडला 2-1 (5) ने पराभूत केले होते. 1971-1974 दरम्यान अजित वाडेकर यांनी 16 कसोटी सामन्यांमध्ये भारताची धुरा सांभाळली होती. त्यापैकी त्यांनी 4 टेस्ट जिंकल्या, तेवढ्याच संख्येने हरले आणि 8 टेस्ट अनिर्णित राहिल्या होत्या.
भारतासाठी एक काळ असा होता की, परदेशात भारतीय संघाचा विजय अशक्य मानला जात असे. अशा परिस्थितीत वाडेकरांनीच भारतीय संघाला परदेशी भूमीवर विजयाची चव चाखवली. त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताला संस्मरणीय असे विजय मिळवून दिले आहेत. वाडेकर 37 कसोटी सामने खेळले असून 31.07 च्या सरासरीने 2113 धावा केल्या आहेत. त्यांनी 1967-68 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपले एकमेव शतक झळकावले होते. अजित वाडेकर हे 90 किंवा त्याहून अधिक धावा करून चार वेळा बाद झाले आहेत पण त्यांना आपले शतक पूर्ण करता आले नाही.
अजित वाडेकर हे भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार होते. मात्र, ते फक्त दोनच सामने खेळले. 1990 च्या दशकात मोहम्मद अझरुद्दीनच्या कर्णधारपदाच्या काळात वाडेकर भारतीय संघाचे व्यवस्थापक देखील राहिले आहेत.नंतर त्यांनी निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
अजित वाडेकर यांनी 237 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 47 च्या सरासरीने 15380 धावा केल्या आहेत. त्यांनी 1966-67 रणजी ट्रॉफी सामन्यात म्हैसूरविरुद्ध 323 धावा केल्या होत्या. वाडेकर यांनी दुलीप ट्रॉफीचे एकूण 18 सामने खेळले आहेत. ते सहा वेळा पश्चिम विभागाचा कर्णधारही राहिले आहेत. त्याने सहा वेळा बॉम्बे संघाचे नेतृत्व देखील केले होते. वाडेकर यांनी 1967 च्या इंग्लंड दौऱ्यावर काउंटी सामन्यांमध्ये 835 धावा चोपल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 36 शतके आणि 84 अर्धशतके जमा आहेत. त्या अर्थाने ते देशांतर्गत क्रिकेटचे खरे बॉस होते.