पाकिस्तानच्या स्टार खेळाडूच्या घरी शोककळा, धाकट्या बहिणीचे आकस्मिक निधन
Pakistan’s cricket : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने अवघ्या ३ दिवसांत विजय मिळवला होता. दरम्यान, एका पाकिस्तानी खेळाडूशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली आहे. या खेळाडूच्या धाकट्या बहिणीचे निधन झाले आहे. हा खेळाडू अलिकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाकिस्तानच्या कसोटी संघाचा भाग होता. या खेळाडूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांमध्ये ही दुःखद बातमी शेअर केली.
पाकिस्तानच्या स्टार खेळाडूच्या बहिणीचे निधन
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास यांच्या धाकट्या बहिणीचे निधन झाले आहे. मोहम्मद अब्बास अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून पाकिस्तानच्या कसोटी संघात परतला आहे. या मालिकेत तो बराच यशस्वीही झाला. मोहम्मद अब्बासची धाकटी बहीण अचानक आजारी पडली आणि गुजरांवाला येथील रुग्णालयात तिचे निधन झाले. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत त्याने चाहत्यांना त्याच्या दिवंगत बहिणीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. मोहम्मद अब्बास यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझी बहीण आता या जगात नाही, अल्लाह तिला स्वर्गात उच्च स्थान देवो.’ कृपया तुमच्या प्रार्थनेत त्याची आठवण ठेवा.
३ वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन
३४ वर्षीय मोहम्मद अब्बासने आतापर्यंत पाकिस्तान संघासाठी २७ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने २३.१८ च्या सरासरीने १०० बळी घेतले. त्याने ५ वेळा एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. दुसरीकडे, त्याने ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त १ बळी घेतला. २०२१ नंतर मोहम्मद अब्बासला पाकिस्तान संघातून वगळण्यात आले. पण, तो ३ वर्षांनी पाकिस्तानच्या कसोटी संघात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे, त्याने २०१९ मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची आकडेवारीही उत्कृष्ट आहे. आतापर्यंत त्याने १८८ सामन्यांमध्ये ९१६ विकेट्स घेतल्या आहेत.