हॅरी ब्रूक(फोटो-सोशल मिडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला गेला आहे. लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा ५ विकेट्सने दारुण पराभव केला आहे. भारताने इंग्लंडला चौथ्या डावात ३७१ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंड संघाने ही लक्ष्य चौथ्या डावात सलामीवीर बेन डकेटच्या शानदार शतकी खेळीने सहज गाठले. इंग्लंडने विजय मिळवला असला तरी या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. पहिल्या डावात ९९ धावांवर बाद झाल्यानंतर आणि दुसऱ्या डावात एकही धाव न काढता हॅरी ब्रूकने एक लाजिरवाणा विक्रमाची नोंद केली. पहिल्या डावात ९९ धावा काढणारा आणि दुसऱ्या डावात शून्य धावांवर बाद होणारा ब्रूक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : पहिल्या कसोटी पराभवानंतर कोच Gautam Gambhir ची मोठी घोषणा! क्रिकेटप्रेमींचा झाला हिरमोड..
लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात, ब्रूक दुसऱ्या डावात इंग्लंडकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याला शार्दुल ठाकूरने आपला शिकार बनविले. त्यानंतर त्याने हा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. ब्रूकने रविवारी (२२ जून) पहिल्या डावात ११२ चेंडूत ९९ धावा काढल्या. प्रसिद्ध कृष्णाने त्याला ९९ धावांवर बाद केले. त्याच्या खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. भारताविरुद्ध ९९ धावांवर बाद होणारा तो मार्कस ट्रेस्कोथिकनंतरचा दुसरा इंग्लिश फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : ‘टीम इंडिया डोबरमन कुत्र्यासारखी…’, भारताच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ
भारताने विजयासाठी दिलेल्या ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून बेन डकेटने १७० चेंडूंचा सामना करत १४९ धावा केल्या. या खेळीत त्याने २१ चौकार लगावले. याशिवाय त्याचा जोडीदार सलामीवीर जॅक क्रॉलीने देखील ६५ धावा करुन महत्वाची भूमिका बाजवली. डकेट आणि क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची मोठी भागीदारी केली. या भागीदारीनंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास कमी झालेला दिसून आला. नंतर जो रूटने ५३ धावा आणि जेमी स्मिथने ४४ धावा करुण विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी मिळवली आहे.