लग्नाच्याच दिवशी मुंबईच्या फलंदाजाने रणजीमध्ये ठोकले शतक (Photo Credit - X)
हा किस्सा आहे १५ नोव्हेंबर १९६५ चा. सुधाकर अधिकारी यांचा विवाहसोहळा त्याच दिवशी सकाळी पार पडला. साधारणपणे या दिवशी प्रत्येक जण सुट्टी घेतो किंवा लग्नाच्या गडबडीत असतो. पण अधिकारी यांचा निश्चय वेगळा होता. विवाहबंधन पार पडताच जराही वेळ न घालवता, त्यांनी थेट बॅट घेतली आणि ते मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पोहोचले.
सुधाकर अधिकारी मैदानात केवळ औपचारिक उपस्थितीसाठी आले नव्हते. त्यांनी दमदार फलंदाजी करत संघासाठी एक अत्यंत उपयुक्त आणि अविस्मरणीय शतक झळकावले. हा पराक्रम पूर्ण करून, सामना संपल्यावर ते सायंकाळी आयोजित केलेल्या आपल्या विवाह रिसेप्शन कार्यक्रमासाठी परतले आणि पाहुण्याचे स्वागत केले. लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशी, कर्तव्य म्हणून मैदानावर उतरणे आणि शतक ठोकणे, हा एक असाधारण त्याग आणि खेळाप्रतीची निष्ठा दर्शवतो.
अधिकारी यांच्या या कृतीमागे केवळ क्रिकेटवरील उत्कट प्रेम नव्हते, तर त्यावेळच्या मुंबई रणजी संघातील स्थान टिकवण्याची तीव्र इच्छा होती. १९६० च्या दशकात मुंबईचा संघ इतका तगडा आणि गुणवत्तापूर्ण होता की, संघात स्थान मिळवणे हेच एक मोठे आव्हान होते. त्यावेळी मुंबईच्या संघाने खुप रणजी ट्राॅफी जिंकल्या होत्या. अन् त्यावेळी मुंबई संघाकडून ५ ते ६ खेळाडू भारतीय संघात असायचे.
सुधाकर अधिकारी यांचे मत असे होते की, “या काळात संघात जागा टिकवणे ही तारेवरची कसरत होती. जर मी सामना टाळला असता, तर दुसऱ्या खेळाडूला संधी मिळाली असती. आणि त्याने उत्तम कामगिरी, विशेषतः शतक ठोकल्यास, मला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागले असते.”
याच कारणामुळे, कोणतीही किंमत मोजून सामना न सोडण्याची जिद्द त्यांनी दाखवली आणि लग्नाच्या दिवशी शतक ठोकून त्यांनी आपले स्थान पक्के केले. मुंबईच्या रंगात खेळणे हा खेळाडूंसाठी मोठा अभिमान होता आणि संघातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी खेळाडूंना अशा मोठ्या त्याग आणि प्रयत्नांची गरज होती, हेच या उदाहरणातून स्पष्ट होते.
माजी क्रिकेटपटू सुधाकर अधिकारी यांनी १९५९ ते १९७१ या काळात मुंबई क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत ६५ सामने खेळले, ज्यात त्यांनी ११ शतकांच्या मदतीने ३,७७९ धावा केल्या होत्या. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानांपैकी एक म्हणजे १९६२-६३ च्या इराणी करंडक सामन्यातील कामगिरी. या सामन्यात त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेष भारताच्या (Rest of India) विरुद्ध मुंबईसाठी १७३ धावांची शानदार खेळी केली होती. सुधाकर अधिकारी यांचे निधन शुक्रवार, २९ जुलै २०२२ रोजी झाले ते ८२ वर्षाचे होते.






