नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून अक्षरशः पदकांचा पाऊस पडला आहे. भारताने यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) मध्ये ६१ पदकांवर नाव कोरले असून त्यात २२ सुवर्णपदतकांचा देखील समावेश आहे. या शानदार प्रदर्शनानंतर आता खेळाडू मायदेशी परतत असून युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा (Jeremy Lalrinnunga) हा देखील मायदेशी परतला असताना त्याच विमान तळावर भारतीयांकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे. जेरेमीने ६७ किलोग्राम कॅटेगरीमध्ये भारताला सुवर्णपदक (Gold medal)मिळवून दिले आहे.
Our Hero – Jeremy Lalrinnunga has landed! Welcome home Champ! ?????♂️ pic.twitter.com/bpgMVUQA9J
— Robert Romawia Royte (@robertroyte) August 8, 2022
जेरेमी हा मूळचा मिझोरम येथील असून त्याचे आयजोल एअरपोर्टवर पोहचल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले. एअरपोर्टवर जेरेमीच्या स्वागतासाठी त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह मिझोरमचे क्रिडामंत्री आणि मिझोरमच्या ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष रॉबर्ट रामविया रोयटे हे देखील उपस्थित होते.
मिझोरमच्या ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष रॉबर्ट रामविया रोयटे यांनी यावेळी म्हंटले, ‘जेरेमीने बऱ्याच अडचणींचा सामना करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले आहे. गरीबी देखील त्याच्या यशाच्या मध्ये अडचण म्हणून टिकू शकली नाही.’ तसंच जेरेमी आणि कांस्य पदक विजेत्या महिला हॉकी संघाची सदस्य लालरेम्सियामी यांच्यासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करणार असल्याचंही ते म्हणाले.
जेरेमीने जिंकले सुवर्णपदक :
वेटलिफ्टिंगच्या ६७ वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या जेरेमीनं स्नॅच इव्हेंटमध्ये १४० किलो वजन उचलून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलून एकूण ३०० किलो ग्रॅम वजन उचलले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. या स्पर्धेतील अखेरच्या प्रयत्नात जेरेमीला अपयश आले. मात्र, तरीही त्यानं सुवर्णपदकावर नाव कोरून बर्मिंगहॅम येथे भारताचा तिरंगा फडकावला. जेरेमी हा मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील त्याचं पहिलचं वर्ष होते. याआधी २०१८ मध्ये त्याने युवा ऑलम्पिक स्पर्धेतील ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.