मुंबई : इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022)भारतीय खेळाडूंनी यंदा दमदार कामगिरी करून देशाची मान अभिमानाने उंचावली. महत्वाची बाबा म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ खेळाडूंचा देखील सहभाग होता. त्यापैकी सात खेळाडूंनी वैयक्तिक किंवा सांघिक प्रकारात पदक पटकावले आहे. महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर झळकवणाऱ्या याच पदकविजेत्या खेळाडूंचा राज्य सरकारनं गौरव केला असून राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत वाढ केली असल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन (Sports Minister Girish Mahajan) यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रकुल पदकविजेत्यांना आता घसघशीत रक्कम बक्षिस स्वरुपात मिळणार आहे.राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला आता ५० लाख रुपये मिळणार आहेत. आधी ही रक्कम १२ लाख रुपये होती.
रौप्यविजेत्या खेळाडूला आधी ७ लाख रुपये बक्षिस रक्कम दिली जायची. पण आता रौप्यविजेत्याला ३० लाख रुपये मिळणार आहेत. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ५ लाखांऐवजी २० लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय पदकविजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना, प्रशिक्षकांनाही खेळाडूच्या बक्षिस रकमेच्या एक चतुर्थांश इतकी रक्कम बक्षिस स्वरुपात मिळणार आहे.
कोणत्या खेळाडूंना फायदा :
यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये सहभागी झालेल्या आणि पदक मिळालेल्या महाराष्ट्रातल्या ७ खेळाडूंना याचा फायदा होणार आहे.
सनिल शेट्टी, सुवर्णपदक (टेबल टेनिस) – ५० लाख
चिराग शेट्टी, सुवर्णपदक (टेबल टेनिस) –५० लाख
स्मृती मानधना, रौप्यपदक (क्रिकेट) – ५० लाख
जेमिमा रॉड्रिग्ज, रौप्यपदक (क्रिकेट) – ३० लाख
राधा यादव, रौप्यपदक (क्रिकेट) – ३० लाख
संकेत सरगर, रौप्यपदक (वेटलिफ्टिंग) – ३० लाख
अविनाश साबळे, रौप्यपदक (स्टीपलचेस) – ३०लाख
यानुसार जवळपास ३ कोटी ५० लाख रुपये बक्षिस रकमेच्या रुपात या पदकविजेत्या खेळाडूंना राज्य सरकार देणार आहे.