फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
एकदिवसीय आयसीसी रँकिंग : तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव केला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. त्याच वेळी, पाकिस्तानने तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेलाही पराभूत केले आहे. याशिवाय, श्रीलंकेने दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचबरोबर आता चॅम्पियन ट्रॉफी सुरु व्हायला फॅट ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. आठ संघ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या सामन्यांच्या निकालांनंतर, आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत बरेच बदल झाले आहेत.
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इंग्लंडची खराब कामगिरी सुरूच आहे. २०२३ च्या विश्वचषकापासून इंग्लंडने २३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी १६ सामने गमावले आहेत. भारत दौऱ्यावरही त्यांना ८ पैकी ७ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडने एक रेटिंग पॉइंट गमावला आहे. इंग्लंडचे रेटिंग आता ९३ वरून ९२ वर घसरले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केल्यानंतर भारताने आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. सध्या टीम इंडियाचे रेटिंग ११९ आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करून पाकिस्तानने एका स्थानाने प्रगती केली. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत त्यांनी सलग दोन सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे.
क्रमांक | संघ | सामने | स्कोअर | रेटिंग |
---|---|---|---|---|
1 | भारत | ४८ | ५७२६ | ११९ |
2 | पाकिस्तान | ३८ | ४२२० | १११ |
3 | ऑस्ट्रेलिया | ४३ | ४७७८ | १११ |
4 | न्यूझीलंड | ४० | ४०९६ | १०२ |
5 | दक्षिण आफ्रिका | ४२ | ४१५१ | ९९ |
6 | श्रीलंका | ५९ | ५७९३ | ९८ |
7 | इंग्लंड | ३९ | ३५६९ | ९२ |
8 | अफगाणिस्तान | ३९ | ३३६५ | ८६ |
9 | बांगलादेश | ४६ | ३७३० | ८१ |
10 | वेस्ट इंडीज | ४१ | ३१८५ | ७८ |
11 | आयर्लंड | २५ | १३०९ | ५२ |
12 | स्कॉटलंड | ३१ | १५८६ | ५१ |
13 | झिम्बाब्वे | २९ | १४७६ | ५१ |
चॅम्पियन ट्रॉफी सुरु होणार आहे, यामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. या आठ संघाचे दोन गटामध्ये विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंडचा संघ आहे तर दुसऱ्या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. टीम इंडियाचे सामने युएईमध्ये एकाच मैदानावर खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित सर्व संघाचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत.