राहुल द्रविड, शुभमन गिल आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारतीय संघ सद्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी, टीम इंडियासह अनेकांनी शुभमन गिलकडे कर्णधारपद दिल्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यांना असे वाटले की शुभमन गिल अजून तरुण आहे. इंग्लंडसारख्या दौऱ्यावर तो कर्णधारपदासह स्वतःच्या फलंदाजीचा दबाव सहन करण्यास सक्षम नाही. आतापर्यंत मालिकेचे दोन सामने खेळले गेले असून कर्णधार शुभमन गिलने त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याने सर्वांचे तोंडं बंद केले आहे.
शुबमन गिलने मालिकेतील दोन सामन्यांमध्ये तीन शतके लागावली आहेत. यामध्ये एका द्विशतकाचाही सामावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने १४६.२५ च्या सरासरीने ५८५ धावा फटकावल्या आहेत. आता मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या दरम्यान कर्णधार शुभमन गिलकडे विराट कोहली आणि माजी अनुभवी खेळाडू राहुल द्रविड यांना मागे टाकण्याची नामी संधी आहे.
हेही वाचा : ICC Test Rankings : शुभमन गिलची मोठी डरकाळी! कसोटी क्रमवारीत हॅरी ब्रूक अव्वल; जो रुटचे साम्राज्य खालसा
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिलला कर्णधार म्हणून इतिहास लिहिण्याची संधी आहे. शुभमन गिलपूर्वी अनेक माजी फलंदाजांना इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान, राहुल द्रविड इंग्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. २००२ च्या मालिकेत त्याने १००.३३ च्या सरासरीने एकूण ६०२ धावा काढल्या होत्या. ज्यामध्ये त्याने तीन शतके आणि एक अर्धशतकी खेळी केली होती.
राहुल द्रविडनंतर, विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने १० डावांमध्ये एकूण ५३९ धावा केल्या होत्या. ५९.३० च्या सरासरीने त्याने या धावा काढल्या होत्या. शुभमन गिल कर्णधार म्हणून या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गिलने या मालिकेत दोन सामन्यात आतापर्यंत एकूण ५८५ धावा केल्या आहेत.
आता त्याला राहुल द्रविड आणि विराट कोहलीचे विक्रम मोडण्याची चांगली संधी चालून आली आहे. जर त्याने लॉर्ड्स कसोटीत फक्त १८ धावा केल्या तर तो या बाबतीत विराट आणि द्रविड या दोन दिग्गजांना मागे टाकेल. लॉर्ड्समध्ये १८ धावा करणे ही कर्णधार गिलसाठी काही मोठी गोष्ट नाही. त्यामुळे तो इंग्लंड मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनने निश्चित मानले जात आहे. कारण, लॉर्ड्सनंतरही गिलकडे फलंदाजीसाठी दोन कसोटी सामने खेळायचे शिल्लक असणार आहेत.