सुनल गावस्कार, जसप्रीत बूमराह आणि यशस्वी जैसवाल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात पांच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील लीड्स येथे पहिलं सामना खेळवण्यात येत आहे. यातील पहिला कसोटी सामना हेडिंग्ले येथे खेळवण्यात येत आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एकूण ४७१ धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या तिघांनी शानदार शतकी खेळी केली आहे. प्रतिउत्तरात मैदानात उतरणाऱ्या इंग्लंड संघाची सुरवात ठीक झाली नसली तरी त्यांना भारताच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा चांगलाच फायदा झाला आहे. यावरून भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.
भारताने दिलेल्या ४७१ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लिश संघानेही शानदार फलंदाजी केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी इंग्लंडने पहिल्या डावात तीन विकेट गमावून २०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान, ऑली पोपने शतक झळकावले आहे. दुसरीकडे, बेन डकेटने देखील शानदार ६२ धावांची खेळी केली.
हेही वाचा : IND vs ENG : इंग्लंडचा गोलंदाजी सल्लागार आला धावून! टिम साऊथीकडून बेन स्टोक्सच्या ‘त्या’ निर्णयाचे समर्थन..
गोलंदाजी दरम्यान, भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीला माघारी पाठवले होते. पण, खरी अडचण भारतासाठी समस्या तेव्हा निर्माण झाली जेव्हा टीम इंडियाने पुढच्या 9 षटकात तीन विकेटच्या संधी हातातून गामावल्या. या चुका टीम इंडियाला चांगल्याच महागात पडल्या. ज्या ऑली पोपचा झेल सोडला त्याने शतक ठोकून भारताला अडचणीत आणले. भारताच्या या कामगिरीवर माजी भारतीय दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.
टीम इंडियाने केलेल्या खराब क्षेत्ररक्षणावर, सुनील गावस्कर यांनी समालोचन करताना म्हटले की, “मला थोडे देखील वाटत नाही की कोणतेही पदक देण्यात येईल, टी. दिलीप सामन्यानंतर देत असतो. ते खरोखर खूप निराशाजनक असे होते. यशस्वी जयस्वाल खूप चांगला क्षेत्ररक्षणकर्ता आहे, परंतु यावेळी तो काहीही पकडू शकला नाही.”
हेडिंग्ले कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने ढिसाळ क्षेत्ररक्षण केले. यावेळी संघाने तीन संधी गमावल्या. पहिल्यांदा, जेव्हा बेन डकेट १५ धावांवर फलंदाजी करत असताना, त्याला एक नाही तर दोन जीवदान देण्यात आले. दुसरीकडे, शतकवीर ऑली पोपचा झेल देखील हुकला. जेव्हा तो ६० धावांवर खेळत होता, तेव्हा स्लिपमध्ये असलेल्या यशस्वी जयस्वालने त्याचा झेल सोडला होता.