दानिश कनेरिया आणि शाहीन आफ्रिदी(फोटो-सोशल मीडिया)
IND VS PAK : काल म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपला दबदबा कायम राखला. या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी विकेटसाठी संघर्ष करताना दिसून आला. या दरम्यान त्याच्या फॉर्मबाबत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने प्रतिक्रिया दिली. त्याने म्हटले की, शाहीन आफ्रिदीला पुन्हा जोश देण्यासाठी क्रिकेटमधून एक महिन्याचा ब्रेक घ्यायला हवा.
शाहीन आफ्रिदी या वेगवान गोलंदाजाने रविवारी भारताविरुद्ध ३.५ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने तब्बल ४० धावा मोजल्या आणि त्याला एक देखील विकेट मिळाली नाही. पाकिस्तानी माजी खेळाडू कनेरियाच्या मते, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू नये. त्याने त्याच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक किंवा दोन फॉरमॅटमधून बाहेर राहायला हवे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : Abhishek Sharma च्या दमदार खेळीनंतर बहिणचं रिएक्शन Viral, म्हणाली – ‘तो लवकरच 100 धावा…
कनेरियाने सोमवारी एका माध्यमाला सांगितले की, “वय ही एक गोष्ट आहे, परंतु पीसीबी त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवू शकत नाही. तो कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळू शकेल, हे त्यांना ठरवावे लागेल. मला वाटते की त्यांनी निर्णय घ्यायला हवा. त्यांनी असे सांगायला हवे, की तो फक्त टी२० आणि एकदिवसीय सामने खेळणार. त्याने कसोटी क्रिकेट खेळू नये कारण तो त्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत नाही. ”
कनेरिया पुढे म्हणाला की, “मला असं वाटतं की, शाहीन आफ्रिदीने क्रिकेटमधून एक महिना ब्रेक घ्यायला हवाम, त्याने सुट्टीवर जावे, विश्रांती घ्यावी आणि परत खेळायला यावे. तो थोडासा फिका पडला असून मला वाटतं त्याला ब्रेक हवा आहे. कदाचित काही महिने तरी. जर तुम्ही जास्त क्रिकेट खेळलात तर तुम्हाला कंटाळा येत असतो. तेव्हा तुम्हाला बरे होण्यासाठी ब्रेक हवा असतो.”
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. पाकिस्तानने २० षटकांत ५ गडी गमावत १७१ धावा उभ्या केल्या. संघाकडून साहिबजादा फरहानने ४५ चेंडूत सर्वाधिक ५८ धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने सर्वाधिक दोन विकेट काढल्या.
हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, अंपायरवर लावला चिटींगचा आरोप!
धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने १८.५ षटकांत ६ विकेट राखून सामना जिंकला. सलामीवीर अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकारांसह ७४ धावा फटकावल्या. तर शुभमन गिलने २८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली.