भारतीय संघाने ट्रॉफी न स्विकारणे 'हा' तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अपमान'; आदिल राजा भडकले
भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने मात करून आशिया कप 2025 चे विजेतेपद नवव्यांदा पटकावले. मात्र सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अनपेक्षित वळण आले. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी नक्वी एका बाजूला उभे होते, तर भारतीय खेळाडू सुमारे 15 यार्ड अंतरावर थांबले होते. त्यांनी आपल्या जागांवरून हलण्यास नकार दिल्यामुळे समारंभ उशिरा पार पडला.
या प्रकारासंदर्भात निवृत्त पाकिस्तानी मेजर आदिल राजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर लिहिताना नमूद केले की, भारतीय संघाने नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हा मोठा अपमान आहे. भारतीय संघाच्या या कृतीमुळे थेट धक्का पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या प्रतिमेलाही बसला आहे.’ असं आदिल राजा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सामना संपल्यानंतर एक तासापर्यंत पाकिस्तानी संघ ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला नाही. फक्त पीसीबी अध्यक्ष नक्वी यांना एकटेच मैदानात राहून लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला. सुमारे ५५ मिनिटांनी जेव्हा पाकिस्तानी संघ बाहेर आला तेव्हा प्रेक्षकांनी “भारत, भारत!” अशी घोषणाबाजी केली.
अंतिम सामन्यापूर्वीच, भारतीय खेळाडू जिंकले तर नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत अशी अटकळ बांधली जात होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि त्यांच्या देशाचे गृहमंत्री असलेले नक्वी हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. भारतीय संघाने पाकिस्तानमधील कोणाशीही हस्तांदोलन न करण्याचे किंवा मैदानाबाहेर कोणत्याही संवादात सहभागी न होण्याचे धोरण स्वीकारल्यामुळेही पाकिस्तानच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून आले.
दरम्यान, संपूर्ण आशिया कपमध्ये पाकिस्तानचा संघ अस्वस्थ दिसत होता. भारताविरुद्धचा प्रत्येक सामना त्यांनी गमावला. पाकिस्तानी खेळाडूंनी आपला संयम गमावण्याचे हे एक कारण मानले जाते. त्यातच अंतिम सामन्यातही पाकिस्तानी संघाची चिडचिड दिसून आली. भारताकडून झालेला पराभव पचवू न शकल्याने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने मिळालेला उपविजेत्या संघाचा चेक सार्वजनिक ठिकाणी फेकला.
सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात, आघा यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रतिनिधी अमिनुल इस्लाम यांच्याकडून उपविजेत्या संघाचा चेक घेतला, पण मागे वळून त्यांनी तोच चेक जमिनीवर फेकून दिला.