अर्शदीप सिंग(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 2nd T20, Arshdeep Singh’s shameful record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दूसरा टी २० सामना खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याने टी २० क्रिकेटमध्ये १३ चेंडूंचे षटक टाकले आणि लाजिवाणा विक्रम रचला आहे.
अर्शदीपने एका ओव्हरमध्ये ७ चेंडू वाईड टाकले. या कामगिरीसह, तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १३ चेंडूंचे षटक टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये हा विक्रम अत्यंत दुर्मिळ असून एका गोलंदाजासाठी तो अत्यंत लज्जास्पद मानला जातो. अर्शदीपच्या या षटकाने चाहते आणि तज्ञ दोघांना देखील आश्चर्यचकित केले आहे.
अर्शदीप सिंग आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १३ चेंडूंचे षटक टाकणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. ज्यामध्ये ६ कायदेशीर चेंडू आणि ७ वाईडचा समावेश होता. यापूर्वी, हा विक्रम अफगाणिस्तानच्या नवीन उल हकच्या नवे जमा होता. ज्याने गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध १३ चेंडूंचे षटक टाकले होते, ज्यामध्ये ६ वाईड आणि १ नो-बॉल होता.
पूर्ण सदस्य संघातील इतर कोणत्याही गोलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इतका लांब ओव्हर टाकली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या सिसंदा मगालाने २०२१ मध्ये जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तानविरुद्ध १२ चेंडूंची ओव्हर टाकली होती.. तथापि, अर्शदीप सिंगने मगालाला मागे टाकत नवीन उल हकच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. अर्शदीप सिंगची ही ओव्हर त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी जरी ठरली असली तरी चाहते आणि विश्लेषक टी-२० क्रिकेटमध्ये ही एक दुर्मिळ घटना असल्याचे मानत आहेत.
हेही वाचा : फुटबॉल मैदानाला दंगलीचे रूप! बघता बघता पाकिस्तानी खेळाडूंमध्ये तूफान हाणामारी; पहा Video
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्या दोन षटकांमध्ये २० धावा मोजल्या. ड्रिंक्स ब्रेकनंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला गोलंदाजीसाठी पुन्हा पाचारण केले. अर्शदीपने ११ व्या षटकात १८ धावा दिल्या, ज्यात त्याने सात वाईड टाकले होते. यात एक षटकार, तीन एकेरी आणि एक दुहेरी धावांचा समावेश होता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाणेफक गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत क्विंटन डी कॉकच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर ४ बाद २१३ धावा केल्या आहेत. क्विंटन डी कॉकने ४६ चेंडूचा सामना करत ९० धावांची खेळी केली. त्याने या खेळीत ५ चौकार आणि ७ षटकार ठोकले. भारताला विजयासाठी २१४ धावा कराव्या लागणार आहेत.






