ध्रुव जुरेल(फोटो-सोशल मीडिया)
Dhruv Jurel created history for India : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. या विजयासह, भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. ध्रव जुरेलने त्याचे पहिले सात कसोटी सामने जिंकून इतिहास रचला आहे.
यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल त्याचे पहिले सात कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडीत काढला. ३५ वर्षीय भुवनेश्वर कुमारने फेब्रुवारी २०१३ मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि त्याचे पहिले सहा कसोटी सामने जिंकले होते. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध भारतासाठी जुरेलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा भारतीय संघाने हा सामना ४३४ धावांनी जिंकला होता.
ध्रुव जुरेलचे पदार्पण
ध्रुव जुरेलने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले होते. पदार्पणानंतर, तो इंग्लंडविरुद्ध रांची आणि धर्मशाळा येथे खेळला आणि भारताने हे सामने अनुक्रमे ५ विकेट्स, एक डाव आणि ६४ धावांनी जिंकले होते. ध्रुव जुरेलने भारतासाठी चौथा कसोटी सामना २२ ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता आणि जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तो सामना २९५ धावांनी आपल्या खिशात टाकला.
ध्रुव जुरेलचा भारतासाठी पाचवा कसोटी सामना ३१ जुलै ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध खेळला गेला होता. भारताने या सामन्यात इंग्लंडचा सहा धावांनी पराभव केला होता. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत, ध्रुव जुरेलला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन्ही कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आणि भारताने हे दोन्ही सामने जिंकले. ध्रुव जुरेलने आतापर्यंत एकूण ७ कसोटी सामने खेळले आहेत आणि भारतीय संघाने सर्व सातही सामन्यात विजय मिळवला.
हेही वाचा : Ind vs WI : भारताची बातच निराळी! दिल्लीत मोडला स्वतःचाच विक्रम; वेस्ट इंडिजला धूळ चारून रचला इतिहास
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने पहिल्या डावामध्ये १२५ धावा फटकावल्या होत्या आणि त्यानंतर दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात ४४ आणि दुसऱ्या डावात नाबाद ६ धावा केल्या होत्या. भारताने दिल्ली कसोटी ७ विकेट्सने आणि अहमदाबाद कसोटी एक डाव आणि १४० धावांनी जिंकून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मलिका २-० अशी जिंकली.