रीचा घोष(फोटो-सोशल मीडिया)
India’s Richa Ghosh creates history: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टनम येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५२ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने ९४ धावांची शानदार खेळी करून मोठी कामगिरी केली आहे. रिचा घोषने ७७ चेंडूत ९४ धावांची दमदार खेळी करत भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले. घोषचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले असले तरी तिने एक इतिहास रचला आहे.
हेही वाचा : IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास
या खेळीसह, रिचा घोष महिला एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक खेळी करणारी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरली आहे. या विक्रमासह तिने माजी भारतीय खेळाडू फौजी खलीली आणि अंजू माने यांना पिछाडीवर टाकले आहे. खलीलीने १९८२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८८ धावांची खेळी होती, तर अंजूने १९९३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ८४ धावा केल्या होत्या. आता भारतीय संघाच्या रिचाने या बाबतीत अव्वल स्थान मिळवले आहे.
भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी १०.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडून भारताला चांगली सुरुवात केली. परंतु, मानधना २३ धावांवर बाद झाली आणि प्रतिका रावलने ३७ धावा केल्या. त्यानंतर, वरच्या फळीतील फलंदाज मैदानावर टिकाव धरू शकले नाहीत. हरलीन देओल १३, कर्णधार हरमनप्रीत कौर ९ आणि जेमिमा रॉड्रिग्ज ० धावांवर माघारी गेली. दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी अनुक्रमे ४ आणि १३ धावा करून बाद झाल्या.
भारतीय संघाने ४० षटकांत १५३ धावांत ७ विकेट गमावल्यानंतर संघ चांगलाच अडचणीत आला होता. यावेळी रिचा घोषने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन संघाला मजबूत स्थितीत आणून पोहचवले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरणाऱ्या घोषने सातवे एकदिवसीय अर्धशतक झळकवले. रिचाने स्नेह राणासोबत आठव्या विकेटसाठी ५३ चेंडूत ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. स्नेह राणाने २४ चेंडूत ३३ धावा केल्या. या खेळीत तिने सहा चौकार मारले.