संजू सॅमसनच्या जागी नवा कर्णधार! (फोटो सौजन्य-X)
Rajasthan Royals announce Riyan Parag as new captain: आयपीएल 2025 चा (IPL 2025) हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थान संघाने पहिल्या तीन सामन्यांसाठी कर्णधार बदलला आहे. यावेळी रियान पराग संघाचे नेतृत्व करेल. त्याच वेळी, संजू सॅमसन एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून संघात प्रवेश करेल आणि त्याला इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात उतरवले जाणार आहे.
राजस्थानचा संघ आयपीएल २०२५ च्या सामन्याची सुरुवात २३ मार्च रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध सामना असणार आहे. संजूच्या अनुपस्थितीत, रियान पराग हा कर्णधार पदाची धूरा सांभाळणार आहे.
संजू सॅमसनला बोटाला दुखापत झाली आहे आणि त्याला अद्याप विकेटकीपिंगसाठी परवानगी मिळालेली नाही. इंग्लंडविरुद्ध टी-२० सामना खेळताना जोफ्रा आर्चरच्या चेंडूने संजूला दुखापत झाली. यानंतर त्याच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे उपस्थित असलेल्या क्रीडा विज्ञान संघाने संजू सॅमसनला फलंदाजीसाठी तंदुरुस्त घोषित केले आहे. दरम्यान संजू सॅमसन पुन्हा यष्टीरक्षक म्हणून काम सुरू करण्यापूर्वी आणखी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत २३ वर्षीय रियान पराग संघाची धुरा सांभाळेल. यासह, तो विराट कोहलीनंतर आणखी एक तरुण कर्णधार ठरला आहे.
राजस्थान रॉयल्सने एका निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या तीन सामन्यांमध्ये रियान पराग संघाचे नेतृत्व करेल. अशाप्रकारे, रायन २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध, २६ मार्च रोजी केकेआरविरुद्ध आणि ३० मार्च रोजी सीएसकेविरुद्ध संघाचे नेतृत्व करेल. संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो फलंदाजीने त्याच्या संघासाठी सातत्याने महत्त्वाचे योगदान देत आहे. क्षेत्ररक्षण आणि विकेटकीपिंगसाठी परवानगी मिळेपर्यंत तो ही भूमिका बजावत राहील. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर कर्णधारपदाची सूत्रे हाती घेईल.