फोटो सौजन्य - सोशल मीडिया
डेहराडून : सध्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु आहे यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू कमालीची कामगिरी करताना दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक तर गुरप्रताप सिंग याने कास्यपदक जिंकून रोईंग स्पर्धेतील सलामीच्या दिवशी शानदार कामगिरी केली. नाशिकच्या मृण्मयी हिने सिंगल स्कल प्रकारातील दोन किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिला हे अंतर पार करण्यास ८ मिनिटे ४७.६ सेकंद वेळ लागला. मध्यप्रदेशच्या खुशप्रीत कौर हिने हे अंतर ८ मिनिटे ४०.३ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले.
मृण्मयी हिने २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कास्यपदक जिंकले होते, तर २०२३ मध्ये तिने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याबाबत मला खात्री होती. त्या दृष्टीनेच मी नियोजन केले होते. रौप्य पदक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. कारण दोन वर्षांपूर्वी या क्रीडा स्पर्धेत मला कास्यपदक मिळाले होते. येथील पदक मला भावी कारकीर्दीसाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे, असे मृण्मयी हिने सांगितले.
पुरुष महिला संघांनी हॉकीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी, तामिळनाडू संघाला केलं पराभूत
पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आर्मी रोईंग सेंटरचा खेळाडू गुरप्रताप सिंग याने दोन किलोमीटरचे अंतर ८ मिनिटे ४ सेकंदात पार केले. सेनादलाचा बलराज पन्वर (७ मिनिटे २६.६ सेकंद) व उत्तराखंडचा नवदीप सिंग (७ मिनिटे ४१.१० सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकाविले. पुण्याचा खेळाडू गुरप्रताप सिंग याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने यापूर्वी सेनादलाकडून भाग घेताना अखिल भारतीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या ५० मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली. गुरुवारी सकाळी १० वाजता अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे. महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने एकूण ५८८ गुणांची कमाई करीत पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्याने नीलिंग (गुडघ्यावर बसून) पोझिशनमध्ये १९५, प्रोन (झोपून) पोझिशनमध्ये २००, तर स्टॅडींग (उभे राहून) पोझिशनमध्ये १९३ अशी एकूण ५८८ गुणांची कमाई करीत अंतिम फेरीची पात्रता मिळविली.
पात्रता फेरीत मध्यप्रदेशच्या प्रताप सिंग तोमरने ५९८ गुणांसह अव्वल स्थान मिळविले. चैन सिंग (५९४), नीरज कुमार (५९१) आणि निशान बुधा (५८९) या सेनादलाच्या नेमबाजांनी अनुक्रमे दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकासह अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती व दोन वेळची ऑलिंपियन नेमबाज असलेल्या राही सरनोबतकडून महाराष्ट्राला पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र, महिलांच्या १० मिटर एअर पिस्तूल प्रकारात ही कोल्हापूरची सुकन्या चौथ्या स्थानावर राहिल्याने चाहत्यांची निराशा झाली.