फोटो सौजन्य - BCCI/X सोशल मीडिया
Champions Trophy 2025 – Mohammed Shami : भारताच्या संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अपराजित आहे, आता टीम इंडियाला ९ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा फायनलचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने संघासाठी ३ विकेट्स घेतले. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर संघामध्ये शमीने पुनरागमन करत आहे. पण सध्या त्याला पुन्हा लयीमध्ये येण्यास काही वेळ जाणार आहे पण त्याची कामगिरी अविश्वनीय आहे.
आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान मोहम्मद शमीचा व्हायरल झालेला फोटो सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणत आहे. या फोटोमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज शमी एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. यावर काही लोक संतापले आणि चुकीच्या कमेंट करू लागले आहेत. तर काही लोक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत कारण त्याने पहिले देशाला ठेवले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की शमीने रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास करायला हवा होता. या सगळ्यात, मुस्लिम धार्मिक नेते त्याच्या बचावासाठी उभे राहिले आहेत. त्याने केवळ ट्रोलर्सवर टीका केली नाही तर मोहम्मद शमीला काही सल्लाही दिला आहे.
१ मार्चपासून देशात पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. २ मार्चपासून मुस्लिम बांधव उपवास करत आहेत. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. त्याच सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये तो एनर्जी ड्रिंक पिताना दिसत होता, त्यानंतर लोकांनी त्याला उपवास ठेवण्याचा सल्ला देण्यास सुरुवात केली.
सेमीफायनल सामन्यादरम्यान मोहम्मद शमीने उपवास सोडल्याबद्दल, मुरादाबाद येथील मुस्लिम धार्मिक नेते इंतेसाब कादरी म्हणाले की, ज्यांना इस्लामबद्दल काहीही माहिती नाही अशा लोकांकडून मोहम्मद शमीला ट्रोल केले जात आहे. इंतेसाब कादरी म्हणाले की, जर कोणी रमजान महिन्यात उपवास सोडला तर तो ईदनंतर सुटलेले उपवास पूर्ण करू शकतो. ते म्हणतात की यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रमजानमधील उपवासाचे फळ रमजान नंतर ठेवलेल्या उपवासांपेक्षा जास्त असते. सोशल मीडियावर सध्या या फोटोची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.