भारतीय महिला संघ(फोटो-सोशल मीडिया)
The Indian women’s team will get a new coach : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून भारतीय महिला क्रिकेट संघाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिला संघासाठी लवकरच एक नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक मिळणार आहे. महिला प्रीमियर लीगनंतर नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहीती आहे. ही जबाबदारी इंग्लंडच्या निकोलस ली या अनुभवी खेळाडूकडे देण्यात आली आहे. महिला प्रीमियर लीगनंतर, भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून या दौऱ्यामुळे संघाला एक नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक मिळणार आहे.
हेही वाचा : नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार
बीसीसीआयकडून इंग्लंडच्या निकोलस ली यांना संघाचे नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला प्रीमियर लीग २०२६ च्या समाप्तीनंतर ते संघात सामील होणार असल्याची माहिती आहे. या वर्षी, महिला प्रीमियर लीग ९ जानेवारी रोजी सुरू होणार असून ५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर लगेचच, भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियासाठी कूच करणार. जिथे १५ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान विविध स्वरूपातील मालिका खेळवण्यात येणार आहेत. एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “डब्ल्यूपीएलनंतर, ली भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारेल.”
निकोलस ली यांना क्रिकेट आणि उच्चभ्रू खेळांमध्ये मोठा अनुभव आहे. ली माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असून त्यांनी १३ सामन्यांमध्ये ४९० धावा केल्या आहेत. त्याने अलीकडेच यूएईच्या आयएलटी२० लीगमध्ये गल्फ जायंट्ससोबत काम केले आहे. याआधी, त्यांनी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ पर्यंत अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून काम केले आहे. मार्च २०२० ते जानेवारी २०२४ पर्यंत त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डात शारीरिक कामगिरी प्रमुख म्हणून देखील काम पाहिले आहे. ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०२० पर्यंत ते श्रीलंकेच्या पुरुष संघासोबत देखील जोडलेले होते.
घरगुती क्रिकेट पातळीवर, निकोलस ली यांनी मार्च २०१२ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यापूर्वी जानेवारी २०१० ते मार्च २०१२ पर्यंत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून राहिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानात्मक दौऱ्यामुळे ली यांची नियुक्ती भारतीय महिला संघासाठी महत्त्वाची असणार आहे.






