फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मीडिया
New Zealand vs Pakistan 4th T20 match : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना धुडकावून लावले. तीन सामन्यांनंतर न्यूझीलंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. आज या मालिकेचा चौथा सामना पार पडला. सामन्यात पाकिस्तानसमोर २२१ धावांचे मोठे लक्ष्य आहे. जर न्यूझीलंडने हा सामना जिंकला तर यजमान संघ मालिकाही जिंकेल. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. काहींनी २०० च्या स्ट्राईक रेटने तर काहींनी २५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
माउंट मौंगानुई येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आघा याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तथापि, त्यांचा निर्णय योग्य ठरला नाही कारण न्यूझीलंडने त्यांचा पहिला बळी ५९ धावांवर गमावला आणि त्यावेळी फक्त ४.१ षटके टाकली गेली होती. यानंतर दुसरी विकेट १०८ धावांवर पडली आणि त्यावेळी ८.१ षटके पूर्ण झाली होती. पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडच्या फलंदाजांचा आक्रमक दृष्टिकोन कायम राहिला आणि त्यांनी १८ व्या षटकात २०० धावा पूर्ण केल्या. यानंतरही किवी फलंदाज थांबला नाही. तथापि, शेवटच्या दोन षटकांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी धावा झाल्या.
प्रथम फलंदाजी करताना मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने २० षटकांत ६ गडी गमावून २२० धावा केल्या. न्यूझीलंडकडून फिन ऍलनने १९ चेंडूत अर्धशतक झळकावले, तर टिम सेफर्टने २२ चेंडूत ४४ धावा केल्या. कर्णधार मायकेल ब्रेसवेलने २६ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १७७ च्या जवळपास होता. सेफर्टने २०० च्या स्ट्राईक रेटने आणि फिन ऍलनने २५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. पाकिस्तानकडून सर्वात यशस्वी गोलंदाज हारिस रौफ होता. त्याने ४ षटकांत फक्त २७ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. इतर सर्व गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट १० किंवा त्याहून अधिक होता.