आयपीएलच्या कोलकाता नाइट रायडर्सने या संघाच्या मुख्यप्रशिक्षक पदी काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पंडित यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता या बदलानंतर पंजाब किंग्स संघातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पंजाब किंग्स संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा करार संपत असल्याने आता संघ नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात असल्याची माहिती मिळत आहे.
पंजाब किंग्जच्या संघाला आजपर्यंत आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. इतकंच नाही तर २०१४ च्या आयपीएलपासून हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचलेला नाही. आयपीएल २०१४ मध्ये पंजाब किंग्जचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि उपविजेते म्हणून संपला, ही त्यांची आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी आहे. पंजाब किंग्सचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा तीन वर्षांचा करार संपत आहे अशा परिस्थितीत फ्रँचायझी त्यांच्यासोबत करार पुढे करणार नसल्याची बातमी येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंजाब किंग्सने अनिल कुंबळेसोबतचा तीन वर्षांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कराराची मुदत या वर्षी सप्टेंबरमध्ये संपत आहे.
फ्रँचायझीने आधीच नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. फ्राँचायझीने ओएन मॉर्गन, ट्रेवर बेलिस आणि माजी भारतीय प्रशिक्षक यांच्याशी संपर्क साधला असल्याचे समजते. शेवटी यापैकी एकाची या पदावर नियुक्ती होऊ शकते. पंजाब किंग्जच्या अधिकाऱ्यांनी पुढील एक-दोन आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
अनिल कुंबळेच्या प्रशिक्षणाखाली पंजाब संघाने ४२ पैकी केवळ १९ सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात पंजाब फ्रँचायझीमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो आणि कागिसो रबाडा या खेळाडूंचा समावेश होता. पण तरीही संघ १४ पैकी केवळ ७ सामने जिंकू शकला आणि सहाव्या क्रमांकावर राहिला.