संजय मांजरेकर(फोटो-सोशल मीडिया)
Sanjay Manjrekar’s controversial statement about Rohit Sharma : संजय मांजरेकर आपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या विधानांनी अनेक वेळा वाद निर्माण झाला आहे. रवींद्र जडेजासोबतच्या वादाचा फटका बसून मांजरेकरला कॉमेंट्री बॉक्समधूनही काढून टाकण्यात आले होते, परंतु मांजरेकर त्याचा मूळ सभाव सोडायला तयार नाहीत. आता आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. तेव्हा या स्पर्धेआधी मांजरेकरने एक एक विधान केले आहे. संजय मांजरेकरने म्हटले आहे की भारतीय एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा हा सर्वकालीन महान भारतीय खेळाडूंमध्ये गणला जाऊ शकत नाही.
हेही वाचा : Asia cup 2025 च्या तोंडावर पाकिस्तानला धक्का! ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम..
संजय मांजरेकर म्हणाला, की “रोहित मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक सर्वोत्तम फलंदाज असला तरी, ‘ऑलटाइम इंडियन बॅटिंग ग्रेट’ च्या बाबतीत रेड-बॉल क्रिकेटला अधिक महत्त्व देण्यात येते. रोहित शर्माने २०२५ च्या सुरुवातीला कर्णधार म्हणून भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावून दिले. त्यानंतर त्याने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३८ वर्षीय रोहित शर्माने बार्बाडोसमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० स्वरूपाला अलविदा म्हटले.
संजय मांजरेकर दूरदर्शनवरील ‘द ग्रेट इंडियन क्रिकेट शो’मध्ये म्हणाला की, “रोहित शर्माचा समावेश सर्वकालीन महान भारतीय फलंदाजांच्या यादीत करता येत नाही, कारण येथे फक्त आपण सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली सारख्या महान खेळाडूंबद्दल बोलत आहोत. रोहित या यादीत येऊ शकत नाही.”
संजय मांजरेकर पुढे म्हणाला की, “पण जर तुम्ही एकदिवसीय क्रिकेट, निस्वार्थीपणा किंवा कर्णधारपदाबद्दल बोलायचं म्हटले तर रोहित शर्माचे नाव घ्यावेच लागणार आहे. विशेषतः २०२३ च्या विश्वचषकानंतर लोकांमध्ये त्याच्याबाबत असणारे प्रेम पूर्णपणे वेगळ्या पातळीवर जाऊन पोहचले. चाहत्यांना दिसले की, तो कधीही स्वतःबद्दल विचार करत नाही, तर संघाच्या फायद्यासाठी त्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचा त्याग करण्यास शर्मा तयार असतो. ही त्याची खरी खासियत राहिली आहे.’
मांजरेकर पुढे म्हणाला की, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या वर्चस्व नेहमीच पाहण्यासारखे असेच राहिले आहे, परंतु जेव्हा ‘ऑल टाईम इंडियन बॅटिंग ग्रेट’चा विचार करण्यात येतो. तेव्हा कसोटी क्रिकेटला अधिक महत्त्व देण्यात येते. मला वाटते की त्याने कसोटीत कोणताही मोठा प्रभाव पाडलेला नाही.”