Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चाहत्यांचे होणार स्वप्नभंग; रोहित शर्मा करणार 'या' गोष्टीला अलविदा(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेतील सर्व सामने जिंकून दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. उद्या म्हणजेच रविवार, 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत न्यूझीलंडशी भिडणार आहे. रोहित शर्माने भारतीय संघाचे शानदार नेतृत्व केले आहे. मात्र, असे असून देखील रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
रोहित शर्माने संघाचे कर्णधारपद सांभाळत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानेही चांगली कामगिरी केली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र, आता रोहितच्या कर्णधारपदाबाबत आता निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. त्याच वेळी, त्याने एकदिवसीय विश्वचषक 2023 आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही धडक मारली. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीतही पोहचला आहे. दुबईत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना रोहितचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करणार आहे. रोहितने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण, तरीही तो वनडे आणि कसोटी खेळू शकणार आहे. मात्र, त्याचा अलीकडचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे रोहित शर्मा मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
मीडिया वृत्तानुसार, भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलचा निकाल नेमका काय लागतो? यावर रोहित शर्माची भविष्यातील रणनीती ठरवणार आहे. कारण, बीसीसीआय एकदिवसीय विश्वचषक 2027 डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघाला एका स्थिर नेतृत्व शोधत आहे.
रिपोर्टनुसार, असेही म्हटले आहे की, रोहित शर्माचा विश्वास आहे की त्याच्यामध्ये अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे आणि तो निवृत्त होणार नाही. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार राहणार की नाही? हे अद्याप ठरलेले नाही.
बीसीसीआयच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, निवृत्ती घ्यायची की नाही हा त्याचा निर्णय आहे, पण कर्णधारपद कायम ठेवण्याबाबत चर्चा होईल. संघाला विश्वचषकाची तयारी करायची आहे, त्यामुळे तर स्थिर कर्णधाराची गरज आहे. हे स्वत: रोहित शर्मालाही समजले आहे. कोहलीशीही याबाबत चर्चा झाली असून त्याच्याबद्दल फारशी चिंता नसल्याचे सांगितले जात आहे.
रिपोर्टनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2025 च्या पराभवानंतर रोहित शर्माच्या भविष्यातील रणनीतीबद्दल बीसीसीआय आणि स्वत: भारतीय कर्णधाराशी आधीच चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे.